ताज्या बातम्यादिल्लीमहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय
मोठी घडामोड..! अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट, तासभर चर्चा, भेटीचं कारण…

महाराष्ट्रातील राजकारणात एकीकडे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची चर्चा जोरात असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आहे.
ही भेट माळेगाव साखर कारखान्याच्या सर्वसाधारण वार्षिक सभेची तारीख आणि वेळ ठरवण्यासाठी झाल्याचे प्राथमिक कारण सांगितले जात आहे. दोन प्रमुख नेत्यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महाराष्ट्राच्या विकास आणि इतर राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, या भेटीने पवार घराण्यातील एकजुटीचे संकेत मिळत आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांची ही भेट मंगळवारी (३० सप्टेंबर) संध्याकाळी ५ वाजता YB चव्हाण सेंटर येथे झाली. ही भेट ठरवून घेतलेली असून, त्यात दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे सुमारे १ तास चर्चा केली. पक्ष फुटीपूर्वी किंवा कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांची भेटी होत असत, पण फुटीनंतर (जुलै २०२३) ही पहिली प्रत्यक्ष आणि वैयक्तिक भेट आहे.
शरद पवार हे मागील दोन दिवस आजारी असल्याने त्यांच्या सर्व भेटी रद्द होत्या आणि ते सकाळी सिल्व्हर ओक निवासस्थानी होते. मात्र, संध्याकाळी ते विशेषतः सेंटर येथे आले आणि लगेच अजित पवार तिथे दाखल झाले.
अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी या भेटीचे स्वागत करत सांगितले, “दोन वरिष्ठ नेते भेटले तर त्यात काय गैर? शरद पवार हे देशाचे नेते आहेत. ही भेट महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसंदर्भाने आणि सामाजिक विषयांवर झाली असावी. राज्याच्या विकासासाठीच ही चर्चा झाली आहे.” दुसरीकडे, शरद पवार गटाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, पण भेटीमुळे आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये रणनीतीबाबत संकेत मिळत असल्याचे बोलले जात आहे.











