ताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

बीड अन् नगरमध्ये आभाळ फाटलं; अनेकजण पुरात अडकल्याने बचावासाठी थेट हेलिकॉप्टर…


अहिल्यानगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात तर बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात सर्वाधिक फटका बसला आहे. कडा (ता. आष्टी) येथे पूरपरिस्थिती खूपच गंभीर बनल्याने लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. लष्करी जवानांनी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बचाव कार्य सुरू केले असून जिल्ह्यात आपत्ती निवारण पथके बचावकार्यात असून काही ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने लोकांना पुरातून बाहेर काढले जात आहे. आतापर्यंत अनेकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात यश आलं असून सुदैवाने जीवतीहानी झालेही नाही. अनेक शेतकऱ्यांची जनावरे मात्र वाहून गेली आहेत. शेतीचे तर प्रचंड नुकसान झाले आहे.

अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील करंजी, जवखेडे, तिसगाव, मढी या भागात ढगफुटीसदृश पाऊस झाला. परिसरातील गावे पाण्याने वेढली गेली. पुलांवरून पाणी वाहत असल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. वाड्या-वस्त्यांना पाण्याने वेढले आहे. करंजी आणि जवखेडे ही गावे अधिक प्रभावित झाली आहेत. या दोन्ही गावातील सुमारे 70 ते 80 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. स्थानिक ग्रामस्थ आणि आपत्ती निवारण पथकांनी त्यांची सुटका केली. करंजी गावात पुरात अडकलेल्या 16 ग्रामस्थांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

 

पाथर्डीचे तहसीलदार उद्धव नाईक, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, अहिल्यानगर येथील महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे बचाव कार्याचे पथक सध्या करंजीमध्ये दाखल झाले आहे. करंजी गावातील प्रसिद्ध उत्तरेश्वर मंदिरालाही पुराचा वेढा बसला आहे. अनेक वर्षांनंतर गावात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. करंजीत नदीला एवढा पूर यापूर्वी आल्याचे आठवत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. नदी पात्र सोडून गावात शिरली. त्यामुळे पक्क्या घरांत राहणारे ग्रामस्थही अडकले.

अहिल्यानगर-जामखेड रस्त्यावरील सारोळाबद्धी परिसरातील पूल पुराच्या पाण्यामुळे वाहून गेला. या रस्त्याचे काम सुरू आहे. वाहतूक वळवण्यासाठी तयार करण्यात आलेला तात्पुरता पूल वाहून गेल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे चिचोंडी पाटील व परिसरातील गावांचा अहिल्यानगर शहराकडे येण्याचा संपर्क तुटला. याशिवाय कडा येथेही पुलावरून पाणी वाहत असल्याने नगर ते जामखेड वाहतूक ठप्प झाली होती.

 

शेजारीच असलेल्या बीड जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर बनली आहे. कडी नदीला आलेल्या पुराचे पाणी गावात शिरले आहे. त्यामुळे सर्वत्र ग्रामस्थ अडकून पडले आहेत. अनेक जण इमारतींवर चढून मदतीची याचना करीत होते. त्यामुळे बचाव कार्यासाठी थेट लष्करालाच पाचारण करण्यात आले. आमदार सुरेश धस कडा गावात दाखल झाले. लष्करी पथकाने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.

 

दरम्यान, दुपारनंतर पावसाने उघडीप दिली. त्यामुळे थोडा दिलासा मिळाला. बचाव कार्यही वेगाने सुरू झाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button