मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या देशभरात आपल्या कॉर्पोरेट-स्टाईल सभांमुळे चर्चेत असले तरी विझ्यअल आर्ट्सचा वापर करून आपलं मत मांडण्याची कला त्यांच्यात आधीपासूनच आहे.
मग ते नरेंद्र मोदी असो वा राहुल गांधी, एसटीचा संप असो वा शेतकऱ्यांची व्यथा, राज ठाकरे आपल्या कार्टून्समधून सतत व्यक्त होत असतात.
मनसे सोडून गेलेले अनेक नेते अशी तक्रार करत असतात की राज ठाकरेंपर्यंत पोहोचता येत नाही. पण राज स्वतः आपल्या कार्टूनच्या माध्यमातून लोकांपर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात.
रविवार 5 मे म्हणजे जागितक व्यंगचित्रकार दिन. त्यानिमित्ताने राज ठाकरे यांना एक पोस्ट शेअर केली आहे. “आज #जागतिकव्यंगचित्रकारदिन ह्या निमित्ताने देशभरातील माझ्या व्यंगचित्रकार सहकाऱ्यांना शुभेच्छा तर आहेतच पण तुमच्या प्रतिभेची देशाला आज सगळ्यात जास्त गरज आहे हे मात्र विसरू नका,” असं ते या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात बाळ ठाकरेंनी काढलेल्या व्यंगचित्रांची महत्त्वाची भूमिका होती. त्या व्यंगचित्रांशी या व्यंगचित्रांची तुलना करता येईल का? व्यंगचित्रकार म्हणून राज कसे आहेत? त्यांच्या व्यंगचित्रांतील रेषा काय सांगतात? व्यंगचित्रकार राज ठाकरे रेखाटण्याचा प्रयत्न काही नामवंत व्यंगचित्रकारांच्या शब्दांत.
‘परिपक्व कलाकार’
“कलाकार म्हणून राज ठाकरे परिपक्व आहेत. राजकारणी राज ठाकरेंपेक्षा व्यंगचित्रकार राज ठाकरे अधिक भावतात,” अशी प्रतिक्रिया बीबीसीचे व्यंगचित्रकार कीर्तीश यांनी दिली.
व्यंगचित्रकार मंजुल म्हणतात, “कुणाही उदयोन्मुख व्यंगचित्रकाराला प्रेरित करतील, अशी त्यांची व्यंगचित्रं आहेत. मध्यंतरीचा बराच काळ त्यांनी व्यंगचित्रं काढली नव्हती. व्यंगचित्र काढण्यासाठी बराच वेळ ही द्यावा लागतो, ही बाब लक्षात घेतली पाहिजे.”
तर राजकीय व्यंगचित्राला आवश्यक गुण राज यांच्याकडे आहेत, असं मत व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांचं आहे.
‘बाळासाहेबांचा प्रभाव’
राज यांच्या व्यंगचित्रांवर बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव आहे, असं मत या तिघांचं आहे. कुलकर्णी म्हणतात, “बाळसाहेब ठाकरे यांना व्यंगचित्र काढताना आणि राजकारण करताना राज यांनी प्रत्यक्ष पाहिलं आहे. त्यांना व्यंगचित्रांचं ‘बाळ’कडू मिळालं आहे.”
कुलकर्णी आणि कीर्तीश यांच्या मते राज यांची व्यंगचित्रं आर. के. लक्ष्मण यांच्या जवळ जाणारी आहेत.
“अर्कचित्रांमध्येही राज यांचा हातखंडा आहे. राजकीय व्यंगचित्र काढताना वेगवेगळ्या नेत्यांचे चेहरे वेगवेगळ्या भावनांसकट वेगवेगळ्या कोनातून दाखवावे लागतात,” असं कुलकर्णी म्हणाले.
“बाळासाहेब ठाकरे आणि आर. के. लक्ष्मण यात मास्टर होते. राजसुद्धा त्याच वाटेवरून जात आहेत.”