..अन्यथा अवघा ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल,”तायवाडेंचा जरांगेंना गंभीर इशारा
गेल्या वर्षभरापासून राज्यात मराठा विरूद्ध ओबीसी असा संघर्ष उफाळून आला आहे. सगेसोयरेंच्या आरक्षणाच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी जरांगेंनी सरकारला 12 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
जरांगेंनी मराठवाड्यातून शांतता जनजागृती रॅली सुरू केली आहे. काल या रॅलीची सुरूवात हिंगोलीमधून झाली असून आता जरांगे परभणीमध्ये आहेत. दुसरीकडे ओबीसी आरक्षण बचाव समितीचे सर्वेसर्वा लक्ष्मण हाके देखील आक्रमक झाले आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, अशी त्यांची मागणी आहे. असं असताना जरांगे मात्र मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळावे या मागणीवर ठाम आहेत. त्यावर आता ओबीसी समाजाचे नेते बबनराव तायवाडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी जरांगेंना थेट इशारा दिला आहे.
…अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल -तायवाडे “सरकारने मनोज जरांगेंच्या दबावाला बळी पडत मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण दिलं तर अवघा ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल. आम्ही सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत, असं असलं तरी आमचं परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष आहे. मराठा आणि ओबीसी एक आहेत याला कोणताही संवैधानिक पुरावा नाही. ओबीसीमध्ये 400 जाती आहेत. त्यामध्ये काही जातींना आरक्षण मिळालं आहे. मराठ्यांच्या सापडलेल्या 57 लाख नोंदी जुन्याच आहेत. सरकारने जरांगेंना खोटी माहिती दिली,” असं तायवाडे यांनी म्हटलं आहे.
“…तर जरांगेंनी 288 जागांवर उमेदवार द्यावेत” मनोज जरांगे सातत्याने निवडणुकीत ओबीसी नेत्यांना पराभूत करण्याचा दावा करताना दिसतात, यावर आता बबनराव तायवाडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मनोज जरांगेंनी येत्या विधानसभेला 288 जागांवर आपले उमेदवार द्यावेत, किती निवडुन येतात ते बघावे. म्हणजे जरांगेंना आपल्या खऱ्या ताकदीचा अंदाज येईल”.
भुजबळ ओबीसींचे बडे नेते -तायवाडे मनोज जरांगे आपल्या प्रचारसभा आणि पत्रकार परिषदांमधून सातत्याने ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळांना टार्गेट करताना दिसतात. भुजबळ हे ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना पराभूत केल्यास अवघा ओबीसी समाज पेटून उठेल, असा इशारा तायवाडे यांनी मनोज जरांगेंना दिला आहे. “मराठा आरक्षणाच्या बाबतील सर्व हरकती विचारात घेऊन सरकारने निर्णय घ्यावा, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागल्यास आम्ही स्वस्थ बसणार नाही” असं तायवाडे यांनी स्पष्ट केलं. ओबीसी समाजाच्या अधिकारांना कोणत्याही प्रकार धक्का लागणार नाही, याची सरकारने दक्षता घ्यावी, अशी अपेक्षा यावेळी तायवाडे यांनी व्यक्त केली. एकंदरीतच तायवाडे यांंनी मनोज जरांगेंसोबत सरकारला देखील गंभीर इशारा दिला आहे.