मान्सूनविषयी आनंदाची बातमी आहे. नैऋत्य मोसमी वारे भारताच्या मुख्य भूमीवर दाखल झाले आहेत. 30 मे रोजी मान्सून केरळ आणि ईशान्येकडील राज्यांत दाखल झाला असल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं आहे.
मान्सूननं केरळचा जवळपास संपूर्ण भाग आणि ईशान्येकडील सर्व राज्यांत म्हणजे मिझोरम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, ही राज्ये व्यापली आहेत. तसंच मेघालय, आसाम लक्षद्वीपमध्येही मान्सूननं पदार्पण केलं आहे. पुढच्या 2-3 दिवसांत मान्सून दक्षिण तामिळनाडू, मन्नारच्या आखाताचा काही भाग, बंगालचा उपसागर, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये दाखल होईल आणि आसाम तसंच अरुणाचलचा उर्वरीत भागही व्यापेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
केरळमध्ये एरवी साधारण 1 जूनच्या आसपास मान्सून दाखल होतो, यंदा तो दोन दिवस लवकर इथे दाखल झाला आहे. अर्थात जूनमध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी सरासरीएवढाच पाऊस पडेल असं हवामान विभागाचं भाकीत आहे. साधारणपणे जूनच्या मध्यापर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रात उत्तर कोंकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
तर दक्षिण कोंकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग), हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, उत्तर भारताला मात्र उन्हाचा तडाखा बसतो आहे. मात्र येत्या काही दिवसांत इथे इथे राहणाऱ्या लोकांना थोडा दिलासा मिळेल.
यंदा मान्सून कसा असेल?
तीन वर्ष दडी मारल्यावर एल निनो 2023 मध्ये पुन्हा प्रकटला आणि तेव्हापासून जगभरात अनेक ठिकाणी तापमानानं उच्चांक गाठले. पण एल निनो आता मागे हटत असल्याचं जागतिक हवामान संघटनेच्या तज्ज्ञांनी जाहीर केलं आहे. भारतीय हवामान विभागानंही त्याला दुजोरा दिला आहे. एल निनो सध्या मध्यम स्वरुपात असून, तो येत्या काळात कमकवूत होत जाईल आणि मान्सूनच्या मध्यावर ला निना चा प्रभाव जाणवू लागेल, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे. तसंच सध्या IOD सम स्थितीत (न्यूट्रल) असून मान्सून सुरू झाल्यावर तो सकारात्मक होईल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. या दोन्ही गोष्टी मान्सूनसाठी पोषक असून यंदा एकूण पाऊस सरासरीपेक्षा जास्त ठरेल असंही हवामान विभागाचं भाकित आहे.
एप्रिल महिन्यात भारतीय हवामान विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय महापात्र यांनी दिलेल्या माहितीनुसार देशभरात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 106 टक्के इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर या दरम्यानच्या नैऋत्य मान्सून काळातील पावसाचा हा अंदाज आहे. हवामान खात्याच्या अंदाजाच्या अचूकतेबाबत बोलताना, वर्तवलेल्या अंदाजापेक्षा 5 टक्के कमी किंवा जास्त प्रमाणात पाऊस होऊ शकतो, असंही ते म्हणाले. तसं असलं तरी सरासरीपेक्षा पावसाचं प्रमाण जास्तच राहील.