‘. तर उद्धव ठाकरे तुरुंगात दिसतील’,अरविंद केजरीवाल यांचा मोठा दावा
दारु घोटाळा प्रकरणात अटक झालेल्या अरविंद केजरीवाल यांची काल तिहार तुरुंगातून सुटका झाली. 1 जून पर्यंत अंतरिम जामिनावर केजरीवाल बाहेर आले आहेत. 2 जूनला पुन्ह त्यांना तुरुंग प्रशासनासमोर आत्मसमर्पण कराव लागणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करताना निवडणूक प्रचारासंदर्भात कुठलीही बंधन घातलेली नाहीत. अरविंद केजरीवाल निवडणूक प्रचार, पत्रकार परिषदा घेऊ शकतात असं कोर्टाने म्हटलं आहे. त्यानुसार अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केलेत.
“पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातील सर्व नेत्यांना संपवायच आहे. विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना तुरुंगात पाठवतील. माझ्याकडून तुम्ही एफिडेविट लिहून घ्या, हे लोकसभेची निवडणूक जिंकले, तर थोड्याच दिवसात उद्धव ठाकरे, ममता बनर्जी, तेजस्वी यादव आणि स्टालिन तुरुंगात दिसतील” असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला. “यांनी भाजपाच्या एका नेत्याला सोडलं नाही. शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे, मनोहर लाल खट्टर यांचं राजकारण संपवलं. हे लोकसभेची निवडणूक जिंकले, तर पुढच्या दोन महिन्यात उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री बदलतील” असं अरविंद केजरीवाल म्हणाले.
‘पुढच्या वर्षी 17 सप्टेंबरला मोदी निवृत्त होत आहेत, मग….’
“मी सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो. मी देशभर फिरणार आहे. माझं तन, मन, धन देशासाठी कुरबान आहे. भाजपमध्ये 75 वर्षानंतर निवृत्ती आहे, अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन यांना निवृत्त केलं, पुढच्या वर्षी 17 सप्टेंबरला मोदी निवृत्त होत आहेत, मग भाजपला मी विचारतो प्रधानमंत्री पदाचा दावेदार कोण आहे? जर यांचं सरकार आलं, तर योगीना डावलून अमित शहा यांना पंतप्रधान केलं जाईल” असं अरविंद केजरीवाल म्हणाले.
‘सट्टा बाजारानुसार 220 जागा येऊ शकतात’
“तुरुंगातून बाहेर आल्यावर गेल्या 20 तासात मी देशभरातल्या अनेक लोकांशी बोललो, त्यावरून असा अंदाज येतो की 4 जून नंतर भाजपचं सरकार बनणार नाही. सगळ्या राज्यात भाजपच्या जागा कमी होणार आहेत. सट्टा बाजारानुसार 220 जागा येऊ शकतात. केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार” असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला.