एकही उमेदावर नसलेल्या पक्षाच्या सभेला परवानगी, आम्हाला का नाही? : अंबादास दानवे
एकही जागा न लढवणाऱ्या पक्षाला शिवाजी पार्कवर सभा घेण्याची परवानगी मिळते. मात्र ४८ जागा लढवणाऱ्या पक्षाला परवानगी नाकारण्यात येते, असे उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले आहेत.
मनसेला १७ तारखेला शिवाजी पार्कवर सभा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. यावर दानवेंनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
येत्या १७ मे ला मुंबईतील शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी मनसे आणि उबाठा या दोन्ही पक्षांनी अर्ज दाखल केला होता. परंतू, मनसेचा अर्ज सर्वात आधी मिळाल्याने मुंबई महापालिकेने मनसेला या मैदानात सभा घेण्यास परवानगी दिली आहे. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील उपस्थित राहणार आहेत.
यावर अंबादास दानवे म्हणाले की, “परवानगी कुणालाही दिली तरी जनता कुणाच्या बाजूने आहे हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे सभा दुसऱ्या मैदानावर घेता येईल. परंतू, जो मनसे पक्ष एकही जागा लढवत नाही त्याला परवानगी देण्यात आली आहे आणि जी शिवसेना ४८ जागा लढवत आहे तिला परवानगी नाकारण्यात आली आहे. मनसे महाराष्ट्रात एकही जागा लढवत नसताना त्याला परवानगी देण्याचा संबंध काय?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.