“माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर…”; पंतप्रधान मोदींचा ‘इरादा पक्का’
संपूर्ण देश सध्या लोकसभेच्या निवडणुका आणि मतदान याबाबत चर्चा करत आहे. उद्या देशभरात तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. देशभरातील 93 मतदारसंघात एकूण 1331 उमेदवारांचे भवितव्य उद्याच्या मतदानावर ठरणार आहे.
मात्र पंतप्रधान मोदी यांना भाजपाप्रणित एनडीएच्या विजयाचा विश्वास आहे. त्यामुळेच मोदींकडे विजयानंतर तिसऱ्या कार्यकाळासाठीची 100 दिवसांची योजना तयार आहे. या योजनेबाबत नुकतेच मोदींनी सांगितले.
“माझा 100 दिवसांचा आराखडा तयार आहे आणि 4 जूननंतर मी एक दिवसही वाया घालवणार नाही. मला माझ्या देशाचे थोडेही नुकसान होऊ द्यायचे नाही. निर्णय घेण्याच्या विलंबामुळे देशाला त्रास सहन करावा लागतो आणि असे मला होऊ द्यायचे नाही. तुम्ही गेली 10 वर्षे माझे ट्रेलर पाहिले आहेत. आगाऊ नियोजन हे माझ्या स्वभावातच आहे. ही देवाने दिलेली देणगी आहे. माझे सॉफ्टवेअर कदाचित अशा प्रकारेच डिझाइन केले गेले आहे,” अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी टाइम्सनाउ नवभारतशी बोलताना सांगितले.
“मला आगाऊ विचार करण्याची सवय आहे. मला याआधी गुजरातमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. माझ्याकडे 2014 आणि 2019 मध्येही योजना तयार होती. आम्ही जे काम केले आहे, ते लोकांनी बघितले आहे. तुम्हीही जर नीट पाहिलेत तर तुम्हाला कळेल की, आम्ही तिहेरी तलाकवर कायदा बनवला. ३७० कलम रद्द केले. आता अजूनही काही मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.