लग्नाहून परतताना अपघात; एकाचवेळी निघाली 7 जीवलग मित्रांची अंत्ययात्रा

राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात रविवारी पहाटेच्या सुमारास ट्रक आणि मारुती व्हॅनची समोरसमोर धडक झाली. या भीषण अपघातामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशधील डुंगरी येथील एक लग्नसमारंभ आटोपून सर्व मित्र मारुती व्हॅनमध्ये बसून माघारी परतत होते. याच दरम्यान भरधाव मारुती व्हॅन आणि ट्रक-ट्रॉलीमध्ये जोरदार धडक झाली. झालावाड जिल्ह्यातील अकलेराजवळ राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. या अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती झालावाडच्या एसपी रिचा ठाकूर यांनी दिली.
अशोक कुमार, रोहित, हेमराज, राहुल, सोनू, दीपक, रवी शंकर, रोहित बागरी आणि रामकृष्ण अशी मृतांची नावे आहेत. यापैकी 7 जण अकलेरा येथील रहिवासी होते आणि एक जण हरनावदा, तर अन्य एक सारोला येथील रहिवासी होता. सर्व मृत 20 ते 25 वयोगटातील आहेत, असे डीएसपी हेमंत गौतम यांनी सांगितले.
दरम्यान, अपघातानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी अकलेरा रुग्णालयात पाठवले. त्यानंतर सर्वांचे मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आले. या अपघातात मृत्यू झालेल्यापैकी 7 जण जीवलग मित्र होते. या मित्रांची अंत्ययात्रा एकाचवेळी काढण्यात आली. यावेळी कुटुंबियांसह संपूर्ण गावाच्या अश्रुचा बांध फुटला.