बीड लोकसभेच्या मैदानातून ज्योती मेटे यांची माघार
बीड : मतांचे विभाजन टाळण्यासाठी बीड लोकसभेच्या मैदानातून शिवसंग्रामच्या नेत्या दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनी माघार घेतली आहे. बीडमध्ये पत्रकार परिषदेत घेऊन त्यांनी हे जाहीर केले.
व्यापक समाजहित लक्षात घेऊन आणि मतांचे विभाजन होऊ नये म्हणून निर्णय घेतल्याचे ज्योती मेटे यांनी स्पष्ट केले.
मेटे पुढे म्हणाल्या, मी बीड लोकसभेची उमेदवारी घ्यावी आणि निवडणूक लढवावी अशी जनभावना होती. त्यामुळे मी त्या दृष्टीने विचार केला, परंतु व्यापक समाजहित लक्षात घेऊन मी बीड लोकसभेच्या मैदानातून माघार घेत आहे. निवडणूक लढवावी असा जनतेचाच होरा होता. त्यामुळे मी त्या दृष्टीने चाचपणी केली, तसेच उमेदवारी देखील मागितली होती. परंतु आता मी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असून पुढील भूमिका लवकरच स्पष्ट करणार आहे.
दबाव किंवा प्रलोभनाला आपण बळी पडणार नाही. आपण दिवंगत विनायक मेटेंच्या पत्नी असल्याने लोकभावनेशी तडजोड नाही. सर्व बाबींची चाचपणी केली. जनतेच्या मनातील भावना आजही कायम आहे. समाजासाठी आपण कुंकू गमावले. त्यामुळे आता गमावण्यासाठी काहीच नाही. लोकभावनेचा आदर करूनच आपण लोकसभा निवडणूक लढविणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान ज्योती मेटे कोणाला पाठिंबा देणार हे पाहणंही औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण काही दिवसांत त्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार या दोघांचीही भेट घेतली होती. त्यामुळे त्या महायुती की महाविकास आघाडी यापैकी कोणाला पाठिंबा देणार हे लवकरच स्पष्ट होईल.
फेब्रुवारी महिन्यात मेटे यांनी शासकीय नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्या राज्याच्या सहकार विभागाच्या अपर सहनिबंधक पदावर कार्यरत होत्या.