भारत कुठल्याही क्षणी आमच्यावर हल्ला करणार! : पाकिस्तान
वृत्तसंस्था : भारत दिवसेंदिवस अधिकाधिक शस्त्रास्त्रसज्ज होत आहे. दक्षिण आशियातील शांततेला त्यामुळे धोका असून आमच्यावर भारत कधीही हल्ला करेल, असे रडगाणे पाकिस्तानने मंगळवारी संयुक्त राष्ट्रे (यूएन) आयोगाच्या बैठकीत गायले.
पाकिस्तानचे प्रतिनिधी मुनीर अक्रम पुढे म्हणाले, भारत शस्त्रास्त्र खरेदीत आघाडीवर आहे. अनेक देश भारताला अद्ययावत क्षेपणास्त्रे, अण्वस्त्रे आणि शस्त्रे पुरवत आहेत. मोठा विनाश त्यामुळे शक्य आहे. भारताकडून पाकिस्तानविरुद्ध दहशतवादाला प्रोत्साहन दिले जात असल्याच्या उलट्या बोंबाही मुनीर यांनी ठोकल्या. काश्मीरमध्ये मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचे तुणतुणेही वाजविले.
वक्तव्यामागील कारण
धोकादायक शस्त्रांवर नजर ठेवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सहायक आयोगाने पाकिस्तानचे उस्मान यांची चालू वर्षासाठी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करताच पाककडून वरीलप्रमाणे वक्तव्य करण्यात आले आहे, हे येथे उल्लेखनीय! आणि विरोधाभास म्हणजे दुसर्या बाजूला पाकचे संरक्षणमंत्री भारताशी संबंध सुधारण्याच्या गोष्टी करत आहेत.
म्हणे भारत अणुबॉम्ब टाकणार!
भारताने युद्धाचे कोल्ड स्टार्ट (थंड सुरुवात) धोरण अंगिकारलेले आहे. भारताकडून पाकवर अचानक अणहल्ल्याचा धोका त्यामुळे वाढलेला आहे, असेही मुनीर अक्रम यांनी नमूद केले.