भूतानच्या महाराजांनी मोदींना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन त्यांचा केला गौरव
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसीय भूतान दौऱ्यावर आहेत. यावेळी भूतानच्या महाराजांनी मोदींना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. ‘ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्यालपो’ हा पुरस्कार प्राप्त करणारे पंतप्रधान मोदी हे प्रथम बिगर भूतानी नागरिक आहेत.
या पुरस्काराचे भूतानमध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. समाजासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो. या पुरस्काराची सुरुवात केल्यापासून आतापर्यंत केवळ चार मान्यवारांना पुरस्कार प्रदान केला गेला आहे. पंतप्रधान मोदींना आतापर्यंत १५ देशांचा सर्वोच्च नागरि पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
या पुरस्कारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून भारतातील १४० कोटी भारतीयांचा सन्मान आहे. सर्व भारतीय नागरिकांच्या वतीने भूतानच्या या महान भूमीतील हा पुरस्कार मी नम्रपणे स्वीकारतो. तसेच या सन्मानासाठी भूतानचे आभार मानतो.”
“भूतानची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी भारत सदैव तुमच्यापाठिशी आहे. बीबी म्हणजेच ब्रँड भूतान आणि भूतान बिलिव्ह या संकल्पनांना भारताचा पाठिंबा असेल. मी खात्रीने सांगतो की, आगामी पाच वर्षांत भारत या संबंधांना नवी ऊर्जा मिळेल. दळणवळण, पायाभूत सुविधा, व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रात संधी निर्माण करण्यासाठी आपण एकत्र काम करू”, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, जेव्हा संपूर्ण विश्व वातावरण बदलाच्या आव्हानाचा सामना करत आहे, तेव्हा भूतानमध्ये कार्बन उत्सर्जन कमी केले जात आहे. भूतानची याबाबत झालेली प्रगती जगाला दिशा देणारी आहे. भारत आणि भूतानमधील युवकांच्या महत्त्वाकांक्षा सारख्याच आहेत. भारताने २०४७ साली विकसित राष्ट्र म्हणून पुढे येण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. तर भूतानने २०३४ पर्यंत उच्च उत्पन्न गटातील देश बनण्याचा संकल्प केला आहे.