ताज्या बातम्या

60 टक्के इथेनॉलवर चालणारे वाहन स्वतः 40 टक्के मोफत वीजनिर्मिती करणार’; मंत्री नितीन गडकरी यांची माहिती


Nitin Gadkari : येणाऱ्या काळामध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठे बदल होणार असल्याचा विश्वास केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी व्यक्त केला आहे. तसेच या महिन्यात टोयोटा कंपनीचे फ्लेक्स इंजिन असलेले चार चाकी वाहन लॉन्च होणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.



तसेच ही गाडी 60 टक्के इथेनॉलवर (Ethanol) चालणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नागपुरातील एमडी ट्रॅव्हल्सच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. तसेच इथेनॉलच्या गाड्या बाजारात आणण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा फायदा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

40 टक्के मोफत वीज निर्माण होणार : नितीन गडकरी

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना म्हटलं की, “इथेनॉलचे वाहन हे स्वतः 40 टक्के मोफत वीजनिर्मिती करण्यास सक्षम असणार आहे. त्यामुळे पेट्रोलची देखील बचत होण्यास मदत होईल. पेट्रोल डिझेलचे दर हे 120 आणि 110 प्रिति लिटर असे आहेत. पण इथेनॉलचा दर हा फक्त 60 रुपये इतकाच आहे. त्याशिवाय 40 टक्के मोफत वीज देखील यामुळे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या वाहनाचा इंधन खर्च हा फक्त पंधरा रुपये प्रति लिटर याप्रमाणे होणार आहे.” तसेच या वाहनांची किंमत जरी जास्त असली तरी ती हळूहळू कमी होईल, असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिलं आहे.

येणाऱ्या काळात वाहतूक क्षेत्रात क्रांती होणार : नितीन गडकरी

भविष्यात अशा वाहनांमुळे ऑटोमोबाईल तसेच ट्रान्सपोर्ट क्षेत्रात क्रांती होणार असल्याचा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये आधुकनिक तंत्रज्ञान प्रणालीला बरचं महत्त्व प्राप्त होणार असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. “पर्यावरणाच्या दृष्टाने पेट्रोल आणि डिझेलची वाहनं थोडी अडचणीची असतात. पण येणाऱ्या काळामध्ये तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलांचा फायदा नागरिकांना आता होणार आहे.”, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता वाहनांमुळे इंधन बचत तर होईलच पण यामुळे प्रदुषण देखील कमी होण्यास मदत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळवण्यास मदत होणार

भात, मका आणि ऊस यांपासून इथेनॉल या इंधनाची निर्मिती केली जाते. त्यामुळे या पिकांचा अतिरिक्त साठ्याचा वापर आता इंधन निर्मितीसाठी करता येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच यासाठी बांबू आणि कापूस यांसाख्या पिकांचा देखील वापर करता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न वाढवण्यास मदत होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Independence Day 2023 : स्वातंत्र्यदिनापूर्वी पंतप्रधान मोदींनी बदलला सोशल मीडिया अकाऊंटवरील डीपी; लोकांनाही केलं ‘हे’ आवाहन


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button