मोदींच्या हस्तक्षेपामुळे युक्रेनवरील आण्विक हल्ला टळला; सीएनएनच्या वृत्तामुळे झाला गौप्यस्फोट
वॉशिंग्टन : रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाला २०२२ मध्ये सुरुवात झाली. त्यानंतर रशियाकडून युक्रेनविरोधात आण्विक हल्ला होऊ नये, यासाठी अमेरिकेने वेगाने प्रयत्न करायला सुरुवात केली. जर रशियाने हा आण्विक हल्ला केला असता, तर दुसर् या महायुद्धात अमेरिकेने जपानवर टाकलेल्या अणूबॉम्बनंतरचा हा दुसरा आण्वस्त्र हल्ला ठरला असता.
मात्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य काही देशांच्या नेत्यांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे अणूयुद्धाची ही शक्यता टाळण्यास मदत झाली, असे अमेरिकेतील सीएनएन या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
रशियाला अण्वस्त्रांच्या वापरापासून परावृत्त करण्यासाठी अमेरिकेला भारतासारख्या काही तटस्थ देशांच्या मध्यस्थीची गरज होती. रशियापर्यंत हा संदेश थेट पोचवण्यासाठी, दबाव आणण्यासाठी आणि परिणामांची योग्य जाणीव करून देण्यासाठी तटस्थ देशांची मदत अमेरिकेला हवी होती. या संदर्भात पंतप्रधान मोदी आणि अन्य नेत्यांचा थेट संपर्क आणि उघडपणे केलेल्या वक्तव्यांचा उपयोग झाला, असे अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकार् यांनी सांगितले.
भारताने चीन आणि अन्य काही देशांवर दबाव टाकल्यामुळेच रशियाला फेरविचार करावा लागला, असेही या अधिकार् याने सांगितले.
ऑक्टोबर महिन्यात रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेइ शोयगू यांनी अमेरिकास ब्रिटन, फ्रान्स आणि तुर्कीये या देशांच्या संरक्षण मंत्र्यांशी पोनवरून चर्चा केली होती आणि संभाव्य आण्विक युद्धाची शक्यता वर्तवली होती. मात्र अमेरिकेच्या गुप्तचरांनी रशियाच्या या संभाव्य हालचालींची माहिती पूर्वीच काढली होती.
त्यानंतर गेल्या वर्षी उझबेकिस्तानमध्ये झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या निमित्ताने बोलताना पंतप्रधान मोदी यांनी सध्याचे युग युद्धाचे नाही, असा स्पष्ट संदेश पुतीन यांना दिला होता. भारतात झालेल्या जी-२० परिषदेच्या निमित्तानेही मोदींनी या संदेशाचा पुनरुच्चार केला होता, याचा दाखलाही या वृत्तामध्ये देण्यात आला आहे.