ऑपरेशन सक्सेस आणि पेशंट डाईट असा त्यांचा फॉर्म्युला – विजय वडेट्टीवार
महायुतीत लोकसभा निवडणुकीकरीता जागा वाटपाचा पेच आणखी वाढला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार सध्या दिल्लीत असून भाजपशी यासंदर्भात बोलणी करतांना दिसत आहेत.
यातच लोकसभेच्या निवडणुकीकरीता सर्वात जास्त जागा या भाजपला मिळणार असून अगदी मोजक्याच जागा शिंदे आणि पवारांना मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यावरून शिंदे आणि अजित पवार गटात अस्वस्थता परसरली आहे. यावरून आता राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी महायुतीवर जोरदार टिका केली आहे.
जोपर्यंत त्याचा उपयोग आहे, त्याला गद्दारी करून फोडायचं अन् गरज संपली की त्याला अरबी समुद्रात विसर्जन करायचं हे भाजपचं वैशिष्ट आहे. त्याच पद्धतीने आता अजित पवार आणि शिंदे गटाचं विसर्जन करतील आणि वेळ पडली तर भाजप ४८ जागांवरही निवडणुक लढवेल, अशी त्यांची सध्याची मानसिकता दिसत असल्याची टिका विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर केली आहे.
दरम्यान, कुटनिती, बईमानी करून दोन्ही पक्ष फोडून त्यांना तात्पुरती मलमपट्टी दिली आहे. ऑपरेशन सक्सेस आणि पेशंट डाईट असा त्यांचा फॉर्म्युला आहे. ऑफरेशन यशस्वी झालं आहे. परंतु रूग्ण दगावला आहे. त्यामुळे शिंदे आणि अजित पवार गटाचा राजकीय अंत आता जवळपास निश्चित आहे. त्यामुळे भाजपने उद्या ४८ जागाही लढवण्याचं ठरवलं तरी यांच्या हातात काहीच नाही. अशी टिका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलीय.
काल मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा देखील उपस्थित होते. परंतु या बैठकीत महायुतीच्या जागावाटपावर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. लोकसभा मतदारसंघाच्या दोन ते तीन जागांवर तिढा कायम असून येत्या ११ मार्चला दिल्लीत पुन्हा महायुतीची बैठक होणार आहे. अजित पवार आणि शिंदे गटाकडून देखील काही जागांवर मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी बैठकीत या जागांवर अंतिम फॉर्म्युला ठरवला जाणार आहे.