उत्तर-मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात शुक्रवारी गारपीट, हवामान विभागाचा अंदाज
उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त उष्ण वाऱ्याचा संयोग होऊन शुक्रवारी, एक मार्च रोजी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतात पश्चिमी विक्षोप (उत्तरेकडून येणारा थंड हवेचा झंझावात) सक्रिय आहे. एक द्रोणिका रेषा दक्षिण कर्नाटकपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत आहे. प्रति चक्रवाताच्या स्थितीमुळे बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त उष्ण वारे राज्यात येत आहे. या थंड वाऱ्याचा आणि बाष्पयुक्त उष्ण वाऱ्याचा उत्तर महाराष्ट्रात संयोग होऊन तुरळक ठिकाणी गारपीट आणि हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. एक मार्चला तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. दोन मार्चला विदर्भात पावसाचा अंदाज आहे. कोकण आणि गोव्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
तुरळक ठिकाणी गारपिटीचा अंदाज
पुढील दोन दिवस उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. एक मार्च रोजी तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
हवामान विभागाचे ‘यलो अलर्ट’
२९ फेब्रुवारी – नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर
१ मार्च- नंदूरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती आणि गडचिरोली. २ मार्च – अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर.