जरांगे यांचे अनेक लाड आम्ही पुरविले पण आता ते मी म्हणजे राजा असं समजायला लागले आहेत
राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे, सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं आहे, मात्र तरी देखील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
सगे, सोयरे शब्दाची अंमलबजावणी करा अशी मागणी त्यांनी केली आहे. दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या एसआयटी चौकशीचे आदेश देखील देण्यात आले आहेत. आता या सर्व पार्श्वभूमीवर भाजप नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले महाजन?
जरांगे यांचे अनेक लाड आम्ही पुरविले पण आता ते मी म्हणजे राजा असं समजायला लागले आहेत, वागायला लागले आहेत. आता हे खपवून घेतलं जाणार नाही. जरांगे यांना आता माफी नाही, त्यांनी मर्यादेत बोलावं. आरक्षण सोडून ते आता राजकारणात आले आहेत. राष्ट्रवादीची स्क्रिप्ट ते वाचत आहेत. लोकांचा त्यांच्यावर विश्वास राहिला नाही, आता विषय संपला आहे, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
जरांगे पाटील यांचा पुन्हा फडणवीसांना इशारा
दरम्यान जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या बाबत फडणवीसांच्या मनात द्वेष आहे, मला जेलमध्ये टाकलं तर, त्यांना दिसेल मराठा समाज काय असतो ते, जसा कापूस फुटल्यानंतर संपूर्ण शेत पांढरं दिसतं तसं सर्वत्र मराठेच -मराठे दिसतील. महाराष्ट्र अशांत करू नका, माझ्यावर दबाव आणू नका, मी राजकीय टीका केलेली नाहीये. पण ते राजकारणी आहेत. मी दहा टक्क्यांचं आरक्षण स्विकारलं तर मी चांगला आणि नाही स्विकारलं तर याला गुंतवा, अशी यांची भूमिका आहे. त्यामुळे माझा संयम सुटला. मी नेत्याला बोललो तर मराठा समाजाच्या नेत्याला राग येण्याचं कारण काय? असा सवाल यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.