Video’जरांगे पाटील मुर्दाबाद’ म्हणत कुठे जाळला पुतळा ?
नागपूर : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आरोप केले. मनोज जरांगेंच्या या टीकेविरोधात नागपुरात आंदोलन करण्यात आलं.
नागपूरच्या गांधी गेट परिसरात सकल मराठा समाज विदर्भ प्रांताच्या वतीने मनोज जरांगेंचा निषेध करण्यात आला.
आंदोलकांनी जरांगे पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली, तसंच जरांगेंचा प्रतिकात्मक पुतळाही पेटवण्यात आला. जरांगे पाटील मराठा समजाच्या आरक्षणाचं नेतृत्व करत होते, पण आता समाज म्हणजे मी असे वागत आहेत, त्यांची भाषा आक्षेपार्ह आहे, अशी टीका आंदोलकांनी केली. जरांगेंच्या शब्दप्रयोगावरून मराठा समाजाच्या अस्मितेला ठेच लागत आहे, त्यामुळे त्यांच्याविरोधात आंदोलन केल्याचं सकल मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी सांगितलं.
व्हिडिओ पहा
👇👇👇👇
सकल मराठा समाज विदर्भ प्रांताच्या वतीने मनोज जरांगेंविरोधात आंदोलन, नागपुरात जरांगेंचा पुतळा जाळला#ManojJarangePatil #MarathaReservation pic.twitter.com/QfzRXJqbSo
— News18Lokmat (@News18lokmat) February 26, 2024
जरांगेंविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान मनोज जरांगे यांच्याविरुद्ध बीडमध्ये दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मनोज जरांगे यांच्यासह रास्ता रोको करणाऱ्या 425 जणांवरती 22 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले गेले आहेत.
दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं आमरण उपोषण मागे घ्यायचा निर्णय घेतला आहे. उपोषण मागे घेतल्यानंतर ते पुढचे काही दिवस संभाजीनगरमधल्या रुग्णालयात उपचार घेणार आहेत. जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर जालना आणि बीड जिल्ह्यातली इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. सकाळपासून मराठवाड्यातल्या काही भागातली इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.
‘मी कुठे रास्तारोको केला, गुन्हे दाखल करायला. रास्ता रोकोचा निर्णय समाजाने मिळून घेतला आहे, याचे परिणाम आणखी भोगावे लागतील. प्रत्येकवेळी पोलिसाचा वापर केला तर लोकं ऐकणार नाहीत. फडणवीसांना दुसऱ्यांदा अंतरवाली सराटी घडवायची होती. इथं काही झालं असतं तर राज्य बेचिराख झालं असतं. शिंदे साहेब तुम्हाला शेवटची संधी आहे, मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका’, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.