अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी रुपये १ लाखापर्यंत तर मिनी अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मदतनीस यांना प्रत्येकी रुपये ७५ हजार पर्यंत लाभ मिळणार
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे १ एप्रिल २०२२ पासूनच्या सुमारे ५ हजार ६०५ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ मिळणार आहे.
त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी रुपये १ लाखापर्यंत तर मिनी अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मदतनीस यांना प्रत्येकी रुपये ७५ हजार पर्यंत लाभ मिळणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिनांक १ एप्रिल, २०२२ पासून ते त्यांना ग्रॅच्युईटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू आणि सेवेतून काढून टाकणे इ. प्रकरणी शासनामार्फत एकरकमी लाभ एकात्मिक बाल विकास सेवा योजना
आयुक्तालयाकडून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
हा लाभ देताना शासन निर्णय दिनांक ३० एप्रिल २०२४ मध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यास व याकरिता येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी लागू करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय भविष्यात घेतल्यास त्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून एकरकमी लाभाची योजना बंद करण्यात येईल, असेही मंत्री तटकरे यांनी यावेळी सांगितले.
आशा सेविकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक : उपमुख्यमंत्री अजित पवार
दरम्यान, मुंबईतील आझाद मैदान येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारलेल्या आशा सेविकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते विजय वडेटि्टवार यांनी विधानसभेमध्ये याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होते. त्यास उत्तर देताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, शासन आशा सेविकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे. आंदोलकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. चर्चा करून आशा सेविकांचे प्रश्न सोडवले जातील, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.