“शरद पवार म्हणजे कलियुगातील शकुनी मामा” – सदाभाऊ खोत

मुंबई : “महाराष्ट्रात जो गोंधळ घातला जात आहे. त्यामागे शरद पवारचं आहेत. महाभारतात शकुनी मामा होता. तर कलयुगातील शकुनी मामा कोण असेल तर ते शरद पवार आहेत.” अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे.
शरद पवारांच्या गटाला निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह दिले आहे. त्यावर सुद्धा सदाभाऊ खोत यांनी निशाणा साधला.
शरद पवार यांच्यावर टीका करताना सदाभाऊ खोत म्हणाले की, “शरद पवारांना चिन्ह सुद्धा चांगले मिळाले तुतारी, तुतारी दोन वेळा वाजवली जाते. एक नवदेवाला हळद लागली की तुतारी वाजते आणि दुसरं पाऊल स्मशानभूमीकडे जाताना तुतारी वाजते. आता शरद पवारांना सुद्धा तुतारी वाजवत जायचं आहे.”
शरद पवार यांच्या गटाला तुतारी हे चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार यांनी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर जाऊन पक्ष चिन्हाचे अनावरण केले. शरद पवारांनी तब्बल ४० वर्षानंतर रायगडाला भेट दिली. त्यामुळे त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बेगडी प्रेम असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.
शरद पवार यांच्या रायगड भेटीवर राज ठाकरेंनी सुद्धा टीका केली. राज ठाकरेंनी मतांसाठी शरद पवारांना आता शिवराय आठवत आहेत, असे वक्तव्य केले. त्यातच आता सदाभाऊ खोत यांनी सुद्धा शरद पवारांना निशाण्यावर घेतले आहे.