कधीच रायगडाची पायरी न चढलेले शरद पवार पक्ष संकटात आल्यावर मात्र रायगडावर गेले मात्र त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शनच घेतले नाही
कधीच रायगडाची पायरी न चढलेले शरद पवार पक्ष संकटात आल्यावर मात्र रायगडावर गेले मात्र त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शनच घेतले नाही
मुंबई : गेल्या ४० वर्षांत कधीच रायगडाची पायरी न चढलेले शरद पवार पक्ष संकटात आल्यावर मात्र रायगडावर गेले. शनिवार, दि. २४ डिसेंबर रोजी मोठा गाजावाजा करीत पक्षाच्या नव्या चिन्हाचे अनावरण केले.
पण, स्वराज्याच्या राजधानीत जाऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शनच घेतले नाही, असा दावा विवेक विचार मंचाचे प्रदीप गावडे यांनी केला आहे.
‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना गावडे म्हणाले, निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या पक्षाला ‘तुतारी हातात घेतलेला माणूस’ हे नवे चिन्ह दिल्यानंतर त्यांनी त्याचे अनावरण रायगडावर केले. त्याचा मोठा गाजावाजाही केला. त्यांच्या पक्षाने रायगडावरील सदरेवर मोठा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमासाठी शरद पवारांनी ४० वर्षांच्या राजकारणात पहिल्यांदाच रायगडाची पायरी चढली. अशावेळी ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतील, अशी अपेक्षा होती. परंतु, तसे न करता ते कार्यक्रम आटपून थेट खाली उतरले.
रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले नाही, असा हा पहिला माणूस असेल. शरद पवार तेथे फक्त राजकीय स्टंटबाजी करायला गेले होते का, असा सवालही प्रदीप गावडे यांनी उपस्थित केला आहे.
स्टंटबाजीसाठी गेले होते का?
शरद पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीचे दर्शन घेतले नाही, हे १०० टक्के खरे आहे. त्यांनी राज सदरेवरील राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) कार्यक्रमाला हजेरी लावली आणि माघारी फिरले. त्यांनी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्याचे फोटो कुठेही दिसणार नाहीत. त्यांनी जर दर्शन घेतले असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेसने फोटो जारी करावेत. आमचे स्पष्ट म्हणणे आहे, त्यांनी दर्शन घेतलेले नाही. हा निव्वळ करंटेपणा आहे. रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांचे दर्शन घेत नाही, असा हा पहिला माणूस असेल. मग फक्त राजकीय स्टंटबाजी करायला तेथे गेले होते का?