आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, 12 जागांचा फॉर्म्युला मान्य नाही
भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात लोकसभेचे जागावाटप कसे होणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागून राहिली होती.
महायुतीच्या नेत्यांनी चर्चा केल्यानंतर आता लोकसभा जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 12 जागा असल्याचं समोर आले. त्यावरुन
खासदार गजानन किर्तीकर यांनी प्रतिक्रिया दिली. हा फॉर्मुला आम्हाला मान्य नसल्याचं गजानन किर्तीकर यांनी सांगितलं. त्याशिवाय आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रियाही व्यक्त केली.
महायुतीमध्ये जागा वाटप सुरु झाल्याचं समोर आले. त्यांचा फॉर्मुलाही मीडियात आला. त्यानुसार, भाजप 32, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 4 जागा लढतील, हे समोर आले. पण यावर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी नाराजी व्यक्त केली. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी आक्रमक भूमिका मांडली. आम्ही काही भाजपच्या दावणीला बांधलो नाहीत, असं त्यांनी सांगितलं.
12 जागांचा फॉर्मुला मान्य नाही – गजानन किर्तीकर
महायुतीचा लोकसभेचा फॉर्म्युला कुठून आला मला माहित नाही. आमच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्हाला 12 जागांचा हा फॉर्म्युला मान्य नाही. 2019 ला आम्ही 22 जागा लढलो होतो त्यात आम्ही 4 जागा हरलो. मग 12 जागा कशा घेणार, असा सवाल गजानन किर्तीकर यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी कॉग्रेसला भाजप आणि शिवसेनेने आपल्या खात्यातल्या जागा द्याव्यात, असं म्हटलं जातेय. आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाहीय. आम्ही जास्त जागा लढवण्यावर ठाम आहोत, असे गजानन किर्तीकर म्हणाले.
महायुतीचा फॉर्मुला काय? –
सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीमध्ये लोकसभेला 32-12-4 या सूत्रानुसार जागावाटप होण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपच्या वाटयाला सर्वाधिक ३२ जागा येतील. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला १२ जागा येतील. तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावे लागू शकते
भाजप नेत्यांकडून शिवसेनेच्या मतदारसंघावर दावा
शिवसेनेचे सध्याचे विद्यमान खासदार आणि गेल्या निवडणुकीत लढवलेल्या मतदारसंघावर भाजपच्या नेत्यांनी दावा ठोकला आहे. शिवसेनेच्या 18 खासांदारांपैकी 13 खासदार शिंदेंसोबत आहेत. पण यातील काही मतदारसंघामध्ये भाजपनं तयारी सुरु केली आहे. महायुतीची जागावाटपाची चर्चा सध्या प्राथमिक स्वरुपात सुरु झाली आहे. यामध्ये भाजपनं 32 जागांवर दावा ठोकलाय. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 12 जागांवर समाधान मानावे लागू शकतं. त्यामुळे महायुतीमध्ये भविष्यात तिढा वाढू शकतो. एकनाथ शिंदें यांना विद्यमान खासदारांसोबत काही दिग्गजांसाठीही तिकिट हवं आहे. त्यामुळे शिंदेवरील दबाव वाढू शकतो. दरम्यान, महायुतीमध्ये मित्रपक्षांकडील मतदारसंघांमध्येही भाजपनं तयारी केली आहे. येथील भाजपच्या काही नेत्यांनी त्यावर दावा ठोकलाय.