धक्कादायक!उपमुख्यमंत्र्याचे बनावट लेटरहेड आणि बनावट सहीचाही वापर केल्याचे उघड
राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे बनावट लेटरहेड, सही आणि ईमेल बनवल्याचा प्रकार उघड झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या बदली आदेशासाठी उपमुख्यमंत्र्याचे बनावट लेटरहेड आणि बनावट सहीचाही वापर केल्याचे उघड झाले आहे. गृह विभागाने परिपत्रक काढून माहिती दिली आहे.
सरकारी विभागाच्या नोकरीसाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. कर्जासाठी खोटे कागदपत्रे सादर केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. याचदरम्यान, आता उपमुख्यमंत्र्यांच्या नावाचा गैरवापर केल्याचा समोर आला आहे.
राज्यात बदली आदेशासाठी उपमुख्यमंत्र्यांचे बनावट लेटरहेड, सही आणि ईमेल बनवल्याच्या प्रकाराविषयी गृहविभानेच परिपत्रक काढून माहिती दिली आहे. बनावट ईमेल, लेटरहेड आणि सहीच्या वापरानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. यामुळे सर्व विभागांना अधिकृत ईमेल वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
बनावाट ईमेलच्या वापरामुळे जीमेल आणि इतर खासगी मेलचा वापर शासकीय विभागांना आता करता येणार नाही. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना मेल करण्यासाठी विभागाच्या अधिकृत मेलचा वापर करावा लागणार आहे.
त्याचबरोबर शासकीय विभागांना व्यवहारासाठी ई-ऑफिस व तत्सम स्थापित सरकारी प्लॅटफॉर्मचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व मार्गदर्शक सूचनांचे सर्व प्रशासकीय विभागांना गृहविभागाने आदेश दिले आहेत. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होत आहे, याची दक्षता सर्व मंत्रालयीन प्रशाकीय विभागांना घेण्यास सांगण्यात आले आहे.