मराठा समाजाचे सर्वेक्षण हे साफ खोटे,एकाही मराठ्याची हजामत करू नका – भुजबळांचे नाभिक समाजाला आवाहन
ओबीसी एल्गार मोर्चाचे अहमदनगर येथे आयोजन करण्यात आले होते. छगन भुजबळ यांनी सभेमध्ये उपस्थितांना संबोधित करताना गंभीर आरोप केले. ओबीसी समाजाच्या मेळाव्याला उपस्थिती लावल्यास अथवा पाठिंबा दिल्यास गावातील ओबीसी कुटुंबांवर मराठा समाजाकडून अन्याय केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
यावेळी बोलताना भुजबळ चांगलेच संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं.
मराठा समाजातर्फे ओबीसी समाजावर अन्याय करण्यात येत असल्याचा आरोप करत भुजबळ यांनी पीडितांची यादीच वाचून दाखवली. यावेळी त्यांनी नाभिक समाजाच्या एका व्यक्तीने ओबीसी एल्गार मोर्चाला पाठिंबा दिल्याने, मराठा समाजाकडून त्याच्या दुकानावर बहिष्कार घालण्यात आल्याचे सांगितले.
‘मराठा समाज बहिष्कार घालत असल्यास न्हावी समाजाने देखील मराठा समाजाच्या एकाही व्यक्तीची हजामत करू नये’ असं जाहीर आवाहनच भुजबळ यांनी मंचावरून यावेळी केलं.
भुजबळ विरुद्ध सरकार, वाद चिघळणार?
छगन भुजबळ यांनी शनिवारी झालेल्या सभेतून देखील आपल्याच सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. काही दिवसांपूर्वीच भुजबळ सरकारविरोधात घेत असलेल्या भूमिकांवरून संजय गायकवाड यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली होती. भुजबळ यांना, कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळाबाहेर काढा असे गायकवाड म्हणाले होते.
अशातच भुजबळ यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात भूमिका घेत, आपल्याच सरकारतर्फे करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने मंत्रिमंडळात भुजबळ एकाकी पडणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
भुजबळ यांचे सरकारवर गंभीर आरोप | Chagan Bhujbal on Maratha
सभेमध्ये बोलताना भुजबळ यांनी मराठा समाजाच्या सर्वेक्षणावरही गंभीर आरोप केले. कर्मचारी १८० प्रश्न असलेला दीड तास लागणारा सर्व्हे दिवसात २५ ते ५० कुटुंबांचा करतातच कसे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मराठा समाजाचे सर्वेक्षण हे साफ खोटे असून कर्मचारी कार्यालयातच ही माहिती भारत असल्याचं त्यांनी सांगितलं