नदीपात्रातील हॉटेलचालकांची पहा हिंमत; थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकालाच धमकावले
पुणे : शहरातील बहुतांश हॉटेल, हातगाड्या, टपर्या या रात्री ११ वाजता बंद केल्या जातात. पण, पोलिसांच्या आशिर्वादाने काही ठिकाणची हॉटेल, टपर्या या मध्यरात्रीनंतरही बिनधास्तपणे सुरु असतात. आम्ही हप्ता देतो, मग कशी कारवाई करतील, असे हे हॉस्टेलचालक फुशारकी मारुन सांगत असतात. इतकेच नाही तर आता त्यांची हिंमत थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला धमकाविण्यापर्यंत गेली. डेक्कनच्या नदीपात्रात रविवारी मध्यरात्री दीड वाजता हा प्रकार घडला.
याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी सचिन हरीभाऊ भगरे (वय ३३, रा. कबीर बाग, नारायण पेठ) याला अटक केली आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट (वय ५३) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार नदीपात्रात रविवारी मध्यरात्री दीड वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट हे सध्या गुन्हे शाखेच्या युनिट ३ मध्ये कार्यरत आहेत. बहिरट हे शनिवारी रात्री रात्रपाळीच्या कर्तव्यावर होते. विश्रामबाग विभागत गस्त घालत असताना त्यांचे पथक नदीपात्रात आले. त्यावेळी मध्यरात्री दीड वाजता तेथील १० ते १२ हॉटेल सुरु होती. सुमारे २०० जण तेथे जमले होते. श्रीहरी बहिरट यांनी हॉटेल बंद करायला सांगितले. तेव्हा सचिन भगरे याने त्यांच्याशी हुज्जत घातली. त्यामुळे पोलिसांनी त्याला डेक्कन पोलीस ठाण्यात आणले. तेथे सचिन भगरे याने फिर्यादी यांना काय करायचे ते कर असे एकेरी भाषेत बोलून फिर्यादींचा हात झटकून दिला. पोलीस अंमलदारांना ढकलून देऊन सरकारी कामात अडथळा आणल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक साळुंखे तपास करीत आहेत.