बीड बायपासवरील हायप्रोफाइल कुंटणखाण्यावर पोलिसांचा छापा
छत्रपती संभाजीनगर : सिडको पोलिसांनी शनिवारी तांबट एज्युकेशनच्या इमारतीत सुरु असलेल्या कुंटणखान्यावर छापा मारला होता. त्यात अटक केलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीवरून उपायुक्तांसह सिडको पोलिसांच्या पथकाने बीड बायपासवरील सेनानगरमध्ये एका बंगल्यामध्ये सुरु असलेला हायप्रोफाइल कुंटणखाना उद्ध्वस्त केला.
एका विदेशी तरुणीसह तिघींची सुटका करून पाच आरोपींना अटक केली. मंगळवारी (दि. १६) संध्याकाळी ७ वाजता ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती पोलिस उपायुक्त नवनीत काँवत यांनी दिली.
तुषार राजन राजपूत (४२, रा. घर क्र. ६२, न्यायनगर, गारखेडा), प्रविण बालाजी कुरकुटे (४०, रा. एशियाड कॉलनी, बाळापूर), गोपाल लक्ष्मीनारायण वैष्णव (२९, रा. कुंभार पिंपळगाव, ता. घनसांगवी, जि. जालना), लोकेशकुमार केशमातो (३५), अर्जून भूवनेश्वर दांगे (३८, दोघे रा. झारखंड), अशी आरोपींची नावे आहेत. राजपूत आणि कुरकुटे हे मुख्य आरोपी असून इतर आरोपी तेथे कामाला हाेते. तरुणींची ने-आण करणे, साफसफाई करणे अशी कामे ते करायचे.
सिडको पोलिसांनी शनिवारी एन-७, विशाल टाॅवरमधील तांबट एज्युकेशनच्या इमारतीत सुरु असलेल्या कुंटणखान्यावर छापा मारून प्रा. सुनील तांबट, संदीप पवार आणि ज्योती साळुंके यांना पकडले होते. तांबट आणि पवार यांना अटक केली होती. या आरोपींची उपायुक्त नवनीत काँवत यांनी चौकशी केली. त्यात बीड बायपासवरील सेनानगर भागात कुख्यात तुषार राजपूत आणि प्रविण कुरकुटे हे दोघे हायप्रोफाइल वेश्या व्यवसाय अड्डा चालवित असल्याची माहिती समोर आली. त्यावरून काँवत यांच्यासह सिडकोच्या निरीक्षक गीता बागवडे, सहायक निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, अंमलदार विजयानंद गवळी, सुभाष शेवाळे, विशाल साेनवणे यांच्यासह महिला अंमलदारांच्या पथकाने सेनानगरातील प्लॉट क्र. 64 वरील विनोद आम्ले यांच्या नावाचा बोर्ड असलेल्या बंगलोमध्ये छापा मारला. तेथे उजबेकिस्तानच्या विदेशी तरुणीसह दिल्लीच्या दोन, अशा तीन तरुणी आणि ग्राहक वेश्या व्यवसाय करताना आढळले. मुख्य आरोपी तुषार राजपूत आणि प्रविण कुरकुटे हे दोघे एजंटगिरी करून हा हायप्रोफाइल अड्डा चालवित असल्याचे समोर आले.