खरंच पुढील 3 दिवस पेट्रोल पंप बंद राहणार? काय आहे नेमकी परिस्थिती
ट्रकचालक आणि वाहतूकदारांच्या संपामुळे राज्यातील बहुतांश पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल संपले आहे. संपामुळे पेट्रोल आणि डिझेलचे टँकर बंद आहेत. त्यामुळे पंपापर्यंत पेट्रोल आणि डिझेल पोहोचू शकले नाही.
वाहतूकदारांनी 1 ते 3 जानेवारी दरम्यान हा संप पुकारला आहे. हिट अँड रन प्रकरणात केंद्र सरकारने नवा कायदा आणला असून त्यानुसार अपघातात चालकाचा मृत्यू झाल्यास त्याला 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपये दंडाची शिक्षा होणार आहे. याविरोधात वाहनचालक आंदोलन करत आहेत. मात्र हा कायदा सर्व वाहनचालकांना लागू होईल. कार चालकही त्याच्या कक्षेत येणार आहे.
यादरम्यान सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल झाले आहे. त्यात तीन दिवस पेट्रोल पंप बंद राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु हा दावा केवळ अफवा आहे. असा कोणताही निर्णय पेट्रोल पंप चालकांनी घेतलेला नाही. पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने PDA) अधिकृतपणे कोणताही संप सुरू करण्याचा किंवा पेट्रोल पंप बंद करण्याचा कोणताही हेतू नाकारला आहे.
पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी कोणताही संप पुकारण्यात आला नसल्याचे स्पष्ट केले आहे. असा कोणताही संप असोसिएशनने नियोजित केलेला नाही असे त्यांनी अधिकृत प्रेस रिलीझमध्ये म्हटले आहे. तसेच नागरिकांना अफवा किंवा चुकीच्या माहितीमुळे घाबरून न जाण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.
ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे (एआयपीडीए) प्रवक्ते अली दारूवाला यांनी नागरिकांना अश्वस्त करत म्हटले की, “सर्व पेट्रोल पंप चालू राहतील. सध्या सुरू असलेल्या देशव्यापी वाहतूकदारांच्या संपाचा पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. जिल्हा प्रशासनाने लोणी आगारातील पेट्रोलियम टँकरना पोलीस संरक्षण दिले असून पेट्रोलियम पदार्थांची भरपाई करणे शक्य झाले आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सर्व पेट्रोल पंप सामान्य कामकाज सुरू ठेवतील.