कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा कहर;दिवसभर जळतायत चिता, स्मशानभूमीच्या बाहेर लागल्यात लांब रांगा
जगभरात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 मोठ्या प्रमाणात पसरताना दिसतोय. ब्रिटन, चीन आणि अमेरिका या भागांमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय.
अशातच चीनमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. डेली स्टारच्या बातमीनुसार, मृत्यू होणाऱ्यांची संख्या इतकी जास्त आहे की, स्मशानभूमी 24 तास सुरू ठेवण्यात आला आहे. या सर्व मृत्यूंमागे JN.1 हा सब-व्हेरिएंट असल्याचं समोर आलं आहे.
हेनान प्रांतात परिस्थितीत बिघडली
WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संस्थेने त्यांच्या अहवालात म्हटलंय की, अलिकडच्या आठवड्यात वेगवेगळ्या देशांमध्ये JN.1 प्रकाराची प्रकरणं वाढतायत. दरम्यान, चीनच्या हेनान प्रांतातील स्थानिक वृत्तपत्रांशी बोलताना लोकांनी परिस्थितीची माहिती दिली आहे. यामध्ये एका व्यक्तीने सरकारी स्मशानभूमी 24 तास खुल्या असून सतत चिता जळत असल्याचा दावा केला आहे.
मिस्टर झू असे या व्यक्तीचं नाव असून त्यांनी ही माहिती दिलीये. त्यांच्या म्हणण्यानुसार, फ्यूनरल होममध्ये एकूण आठ स्मशानभूमी आहेत. या सर्वांमध्ये 24 तास मृतदेह जळत असतात.
शवागारात ठेवावे लागतायत मृतदेह
या ठिकाणी परिस्थिती इतकी भयानक झाली आहे की, सरकारी स्मशानभूमी कमी पडू लागल्या असल्याचं या व्यक्तीचं म्हणणं आहे. मिस्टर झू पुढे म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत अनेक खासगी स्मशानभूमीही उघडली आहेत. त्याचा व्यवसाय अतिशय वेगाने सुरू आहे. स्थानिक स्मशानभूमींची संख्या सातत्याने वाढतेय. एवढेच नाही तर सध्या इतके मृतदेह येतात की, त्यांना अग्नि देण्याची वाट पहावी लागतेय. स्मशानभूमीत लांबच लांब रांगा लागत आहेत आणि मृतदेह जाळण्यापूर्वी शवागारामध्ये ठेवावे लागतात.
मिळालेल्या माहितीनुसार, चीनमध्ये सध्या 118,977 पॉझिटिव्ह प्रकरणं आहेत. यापैकी 7,557 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र, मृत्यूची नेमकी आकडेवारी अजून समोर आलेली नाही.
भारतात कोरोनाची कशी आहे स्थिती?
कोरोना व्हायरस JN.1 चे सब व्हेरिएंट भारतात देखील झपाट्याने वाढू लागला आहे. देशात आतापर्यंत याची लागण झालेले 83 रुग्ण आढळले आहेत. JN.1 चा सर्वाधिक फटका गुजरातला बसला आहे जेथे 34 प्रकरणे आढळून आली आहेत. कोविड नमुन्यांची जीनोम सिक्वेन्सिंग करणारी संघटना INSACOG ने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात व्यतिरिक्त गोव्यात 18, कर्नाटकातील 8, महाराष्ट्रातील 7, केरळ आणि राजस्थानमधील प्रत्येकी 5, तामिळनाडूमधून 4 आणि तेलंगणातील 2 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत.