पुण्यात भयंकर स्कॅम उघड, इंजिनिअर तरुणाला सुद्धा गंडवलं, 200 कोटींना चुना
पुणे : घरबसल्या लाखो रुपये कमविण्याच्या हव्यासा पोटी अनेकजण ऑनलाईन टास्कच्या मोहात अडकल्याने त्यांना कोट्यवधींचा चुना लागलाल्याच्या घटना तुम्ही एकल्या असतील.
असे एक दोन नव्हे तर देशातील तब्बल 3 कोटी उच्च शिक्षित तरुण अशाच एका ऑनलाइन फ्रॉडच्या जाळ्यात फसलेत अन् या सर्वांना गंडवणाऱ्या एका आंतररष्ट्रीय सायबर गुन्हेगारांचे रॅकेट पिंपरी चिंचवड पोलिसांनी उद्ध्वस्त करत आरोपींनी जेरबंद केलंय.
पुण्याच्या हिंजवडीतील नामांकित कंपनीत कार्यरत असणाऱ्या अनेक आयटी अभियंत्यांना त्यांच्या मोबाईलवर एक ऑनलाईन टास्क आला. ‘रेटिंग द्या अन् पैसे मिळवा’ हे वाचून, घरबसल्या वरचा खर्च निघेल, या आशेने हे अभियंते या टास्कच्या मोहात पडले अन् त्यांना लाखो रुपयांना गंडा बसला.
या भामट्यांच्या जाळ्यात अडकलेला प्रशांत एकटाच नाही, तर या टोळीनं देशभरातील तीन कोटी उच्च शिक्षितांकडून तब्बल 200 कोटी हडपले. ऑनलाईन टास्कद्वारे गंडा घालणारी टोळी तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करते. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्यांनी मोठी शक्कल ही लढवली होती. ‘ऑनलाईन टास्क”च्या जाळ्यात अडकवण्यासाठी या भामट्यांनी तीन टप्पे पडले होते.
पहिला टप्पा : गोरगरिबांच्या नावाने बँकेत खाती खोलायची अन् ती खाती विकत घ्यायची.
दुसरा टप्पा : या खात्यांवरून टास्क सोडवणाऱ्यांना पैश्यांची देवाण-घेवाण व्हायची
तिसरा टप्पा : त्या खात्यांवरील रक्कम गायब केली जायची.
तपासात या धक्कादायक बाबीसमोर आल्या अन् पिंपरी चिंचवड पोलीस ही चक्रावून गेले.
पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने शिताफीनं तपास करत या टोळीचा पर्दाफाश केला. आतापर्यंत 14 आरोपींना बेड्या ठोकल्यात. तब्बल 95 बनावट बँक खाती ही सील केली. हॉंगकॉंग व्हाया दुबई पर्यंत तपासाची लिंक ही पोहचली आहे. पण हडप झालेले 200 कोटी प्रशांत टालेसह अन्य तक्रारदारांना परत फेडतील का? याबाबत शंका आहे. त्यामुळे तुमच्यावर ही वेळ येऊ द्यायची नसेल तर आपल्या हातातील मोबाईलमध्ये येणाऱ्या लिंकवर क्लिक करताना, हजारदा विचार नक्की करा.