भद्रस : अंधश्रद्धेतून नरबळीसारख्या घटना समाजात अजूनही पाहायला मिळतात. चुकीच्या समजूतीवरून अशा प्रकारचं घृणास्पद कृत्य केलं जातं. मूल व्हावं यासाठी एक महिलेनं तांत्रिकाच्या सांगण्यावरून एका निष्पाप लहानगीचा बळी दिल्याची घटना कानपूरमध्ये सुमारे तीन वर्षांपूर्वी घडली होती.
ही घटना काळजाचा थरकाप उडवणारी आहे. न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून, चार आरोपी दोषी आढळले आहेत. या प्रकरणात सहा वर्षांच्या एका मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर एका निपुत्रिक दांपत्याने या मुलीचं काळीज काढून खाल्लं होतं.
14 नोव्हेंबर 2020 रोजी कानपूरच्या घाटमपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या भद्रस गावात एक भीषण घटना घडली. मानवतेला लाजवेल अशा या घटनेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करून संताप व्यक्त केला होता. तसंच आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दिवाळीचे दिवस होते. एक निष्पाप मुलगी गावातल्या दुकानात फटाके खरेदी करण्यासाठी गेली होती. तिथून ती बेपत्ता झाली. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह शेतात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. पोलीस तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती.
भद्रस हत्याकांडाची सुनावणी कानपूर इथल्या पॉक्सो अॅक्ट वॉकर शमीम रिझवी यांच्या न्यायालयात सुरू आहे. एडीजीसी प्रदीप पांडे यांनी सांगितलं, की या प्रकरणात आरोपी दोषी सिद्ध झाले आहेत. या प्रकरणातल्या दोषींना 16 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 12.15 मिनिटांनी शिक्षा सुनावली जाणार आहे. यात चार जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे. गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी न्यायालयात दाद मागण्यात आली आहे.
या प्रकरणात, या निष्पाप मुलीचे मानलेले काका परशुराम आणि त्यांच्या पत्नीने मूल व्हावं यासाठी मांत्रिकाच्या सल्ल्याने मुलीची हत्या केली होती. या दोघांनी या मुलीचं हृदय काढून खाल्लं. ‘या मुलीचं हृदय खाल्लं तर तुम्हाला मूल होईल,’ असं या दांपत्याला मांत्रिकानं सांगितलं होतं. या मुलीच्या प्रायव्हेट पार्टला मोठ्या प्रमाणात इजा झाली होती. यावरून तिच्याबाबत क्रूरतेची परिसीमा ओलांडल्याचं स्पष्ट होतं. तसंच तिचं लिव्हर, फुफ्फुसं, हृदय बाहेर काढण्यात आलं होतं. हे अवयव मूल व्हावं यासाठी त्या दांपत्याकडे खाण्याकरिता देण्यात आले होते.
ही वस्तुस्थिती न्यायालयात मांडताना एडीजीपी प्रदीप पांडे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. न्यायालयासमोर रडत रडत त्यांनी ‘हा दुर्मीळ श्रेणीतला गुन्हा असून चारही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी,’ अशी मागणी केली होती. यावर न्यायालय आता आरोपींना काय शिक्षा सुनावतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.