नागपूर : चाकडोह (बाजारगाव) येथील सोलर कंपनीतील स्फोटाच्या घटनास्थळाचा आढावा घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूरकडे परत असताना गोंडखैरीच्या बसस्थानकाजवळ मुख्यमंत्र्यांच्या समोर एक अपघात झाल्याचे चित्र त्यांना दिसले.
त्या ठिकाणी अपघातामध्ये एक ट्रक आणि दुचाकीची धडक झाली होती. त्याचवेळी त्या ट्रकने कारलाही कट मारला होता. या घटनेपूर्वी अमरावतीहून येणाऱ्या बसला याच ट्रकने धडक दिली होती. त्यात काही प्रवासी जखमी झाले. मात्र, त्यानंतर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुण गिरीश केशराव तिडके ट्रकच्या बोनटमध्ये जाऊन अडकला होता व गंभीर अवस्थेत होता. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमाव होता. मात्र, त्याला कोणी मदत करत नव्हते.
मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणची गर्दी आणि अपघात पाहताच त्यांचा ताफा तिथे थांबवायची सूचना केली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे त्या ठिकाणी स्वतः खाली उतरले. त्यांनी त्या तरुणाला ट्रकच्या खालून काढायला लावले. त्याच्या पायाला गंभीर जखम झाली होती. तिथे रुग्णवाहिका बोलाविण्यात आली आणि त्या जखमी तरुणाला रुग्णवाहिकेत पाठवून मुख्यमंत्री स्वतः रवी नगर चौकातील सेनगुप्ता रुग्णालयात दाखल झाले. त्या ठिकाणी त्या तरुणाला दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे. तरुणाला रुग्णालयात दाखल करेपर्यंत मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः त्याच्या उपचाराची पूर्ण व्यवस्था केली
मिळालेल्या माहितीनुसार रात्री ९: ३० वाजताच्या वाजताच्या सुमारास अमरावती येथून नागपूरच्या दिशेने येणाऱ्या बसक्रमांक एम.एच.४०-वाय ५५८१ ला गोंडखैरी येथील ब्रेकरजवळ ट्रक क्रमांक सी.जी.०४-एल.एफ.४०४६ च्या चालकाने मागून धडक दिली. त्यावेळी रस्ता ओलांडताना दुचाकीस्वार गिरीश तिडके (माेटारसायकल क्रमांक एम.एच.४०-ए.जे-२६२०) ट्रकची धडक बसली. तो मोटारसायकलसह ट्रकच्या बोनेटमध्ये अडकला होता. यानंतर ट्रकने कारलाही कट मारल्याने यात बसलेले पंकज महादेव आगलावे यांच्यासह त्यांचे वडील,आई व पत्नी किरकोळ जखमी झाले होते. त्याच्याशिवाय या अपघातात जखमी झालेल्या वंदना राकेश मेश्राम (सिद्धार्थनगर, वाडी), रंजना शिशुपाल रामटेके (रा.रामबाग, मेडिकल), शुद्धधन बाळूजी काळपांडे (रा.मौदा) यांच्यासह इतर प्रवाशांना रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले.