वर्धा आणि शिरणा नदीच्या पाण्याने गावात हाहाकार नागरिकांना बोटीद्वारे सुरक्षित ठिकाणी हलविले
चंद्रपूर : जिल्ह्यातील व वरोरा तालुक्यात वर्धा नदीच्या पुराचा कहर बघायला मिळतो आहे. सोईट, बेलसनी-माजरी या गावांमधून शेकडो ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलवले (villagers shifted ) गेले आहे.
सोईट व पळसगाव येथे बिकट परिस्थिती आहे. करंजी व सोईट येथील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी राज्य आपत्ती निवारण (State Disaster Relief) दलाच्या चमूने प्रयत्नांची शर्थ चालवली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासापासून पावसाने उसंत घेतली आहे. तरीही धरणांमधून सोडलेल्या पाण्यामुळे वर्धा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. पाऊस नसताना आलेल्या या महापुराने नागरिक बेहाल झाले आहेत. वर्धा नदीकाठच्या सर्वच गावांना प्रशासनाने अति सतर्कतेचा इशारा दिला आहे. तेलंगणात जाणारा राजुरा शहराजवळच्या (Rajura City) वर्धा नदीवरील पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. आज रात्रभर पोलीस प्रशासन व नागरिक यांची परीक्षा असणार आहे.
शेकडो ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवले
नदीच्या पाण्याने पळसगावात हाहाकार
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातल्या पळसगावची स्थिती बिकट झाली आहे. वर्धा आणि शिरणा नदीच्या पाण्याने गावात हाहाकार माजविला आहे. 1994 नंतर पहिल्यांदाच ग्रामस्थांनी मोठा महापूर अनुभवला आहे. संपूर्ण गावात चार ते पाच फूट पाणी आहे. सातशे लोकसंख्येचं हे गाव रिकामे करण्यासाठी राज्य आपत्ती निवारण दलाचे जवान कामी लागले आहेत. वर्धा नदीवरील यवतमाळ- वर्धा जिल्ह्यातील धरणे ओसंडून वाहत असल्याने नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे. याचा थेट परिणाम वर्धा नदीकाठच्या सर्वच गावांना बसलाय. या सर्व नागरिकांना बोटीद्वारे सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी सकाळपासून बचाव अभियान सुरू आहे. गावात कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी यंत्रणा ॲक्शन मोडवर आहे.