उद्धव ठाकरेंमुळे निवडून आलेले गाताहेत मोदींचे गुणगान – सुषमा अंधारे
मनमाड : महाराष्ट्राला शिवसेनेची गरज आहे. मात्र गद्दारांनी पक्ष फोडला, असे सांगत शिवसेना पक्ष, चिन्ह, विचारधारा आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे निवडून आलेले आता मोदींचे गुणगान गातात, अशी टीका शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली
आमदार सुहास कांदे यांच्यावर टीका करत त्यांच्याविरोधातील ‘लाव रे तो व्हिडिओ’ असे म्हणत सभेची परवानगी नाकारणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेच्या समाचार घेतला.
श्री. कांदे यांच्या समर्थकांनी अंधारे यांचा ताफा अडवण्याचा आणि गो-मूत्र शिंपडण्याचा प्रयत्न केला असल्याने विटाळा मानण्याची प्रथा सुरू केली काय? असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी येथील सभेत केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महाप्रबोधन यात्रेची मशाल रॅली मनमाडमध्ये आल्यानंतर स्वागत करण्यात आले. संपर्कप्रमुख जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, नितीन आहेर, उपजिल्हा प्रमुख संतोष बळीद यांनी अंधारे यांचे स्वागत केले.
माजी आमदार जगन्नाथ धात्रक, अनिल आहेर, श्री. बळीद, संजय कटारिया, प्रवीण नाईक, संतोष गुप्ता, ॲड. सुधाकर मोरे, विकास कटारे, माधव शेलार, दिलीप नरवडे, कैलास अहिरे, आम्रपाली निकम, नाजीम शेख, सुधीर पाटील, विजय मिश्रा, सुनील पाटील, पद्मावती धात्रक, मुक्ता नलावडे, कविता छाजेड, रेणुका जयस्वाल, लीला राऊत, सुरेखा मोरे, कविता परदेशी, विनय आहेर, प्रमोद पाचोरकर, खालीद शेख, कैलास भाबड, लियाकत शेख, आशिष घुगे, अंकुश गवळी, सनी फसाटे, पवन पवार, इरफान शेख आदी उपस्थित होते.
अंधारे यांनी भाडोत्री माणसे जमवून मला घाबरवण्याचा प्रयत्न केला, पण श्री. कांदे मला घाबरले, अशी टीका केली.
तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांना सभेची परवानगी नाकारण्याचा अधिकार आहे का? याचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला जाणार आहे, असे सांगून त्यांनी श्री. मोरे श्री. कांदेंचा पगार घेतात की सरकारचा? असा प्रश्न उपस्थित केला.
यावेळी त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह इतर व्हिडिओ लावायला सांगितले.
विधानसभेच्या आगामी निवडणुकीत गुलाल गणेश धात्रक यांचा असेल असे सांगत अंधारे म्हणाल्या की, विविध पक्षातून फिरून शिवसेनेत आले आणि निवडून आले. आता आम्हांला शहाणपण शिकवतात.
राष्ट्रवादी काँग्रेसला नावे ठेवायची आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचे हे कसे चालते? नांदगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला नाही आणि मराठा आरक्षण मिळाले नाही, तर आमदारकीचा राजीनामा देईल असे म्हटल्यावर राजीनामा का दिला नाही? गणेश धात्रक आणि त्यांच्या ‘टीम’ ने करंजवण योजनेसाठी काय केले, हे सर्वांना माहीत आहे. तरी त्याचे श्रेय लाटले जात आहे.