आरक्षणाची झुंज शेवटच्या टप्प्यात ; मराठा बांधवानो एकजुट कायम ठेवा
मराठा आरक्षणाबाबत सत्तर वर्ष फसवणुक केलेल्या बॅकलॉग सरकारला भरुन काढायचा आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण मिळण्याचा लढा तीव्र केला आहे, यासाठी तुमची साथ हवी आहे.
मी सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
शहरातील हुतात्मा स्मृती वाचनालयासमोर राष्ट्रीय महामार्गावर पंधरा फुट लांबीचा, सातशे किलो वजनाचा हार सकल मराठा समाजाच्यावतीने घालण्यात आला. तेथून भव्य मिरवणुकीने ७५ जेसीबीतुन फुलांचा वर्षाव करत शिवाजी महाविद्यालयात आगमन झाले,
तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला जरांगे पाटील यांनी पुष्पहार अर्पण केले. येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या (कै.) शिवाजीराव मोरे क्रीडा संकुलाच्या भव्य प्रांगणावर रविवारी (ता.१०) रात्री नऊ वाजता मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला प्रारंभ झाला.
रात्री थंडीचा गारवा असतानाही, त्याची पर्वा न करता महिला, पुरुष मोठ्या उत्साहाने नागरिक उपस्थित होते. प्रारंभी शाहिर संतोष साळूंके यांनी पहाडी आवाजात मराठा आरक्षणासंदर्भात प्रबोधन केले. रविंद्र बनसोड यांनी मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भातील इतिहास मांडला.
या वेळी जरांगे पाटील पुढे म्हणाले की, १८०५ पासून १९६७ व आज २०२३ पर्यंत आरक्षणाच्या नोंदी सापडल्या आहेत. मग या नोंदी होत्या तर आजपर्यंत झाकून कोणी ठेवल्या होत्या, असा सवाल त्यांनी सरकारला केला.
ज्या जाती ओबीसीत नाहीत, त्यांची यादी तयार करा, जे सध्या ओबीसी आहेत, ते ओबीसी म्हणून सिद्ध करा आणि नव्याने ओबीसी जनगणना करावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. १९३१ मधील ब्रिटिश जनगणना जशाच तशी उचलून नोंदी न घेता सरकारपुढे ठेवण्यात आल्या. त्यानंतर १९९० मध्ये
१४ टक्के ओबीसींना याच नोंदीवर आरक्षण देण्यात आले. तर लगेच चार वर्षांनंतर हेच आरक्षण १९९४ ला ३० टक्क्यांवर कसे काय नेले. मराठ्यांचे आई-वडील रात्रं-दिवस कष्ट करून, पोटाला चिमटा देऊन लेकरांना शिकवितात.
मात्र, एक मार्क कमी पडल्यामुळे तो रडत घराकडे येतो. यापेक्षा त्या लेकरांचे आई-वडिलांचे व या जातीचे दुर्दैव काय असू शकते. खरेतर मराठा व कुणबी ही एकच जात आहे. इतर जातीतील उपजातीना जसे आरक्षण दिले, त्याचप्रमाणे कुणबी मराठा जातीसही सरसकट आरक्षण दिले पाहिजे.
छगन भुजबळांवर टिकास्त्र
मराठा आरक्षणाला विरोध करणारे मंत्री छगन भुजबळांवर जरांगे पाटील यांनी टिकास्त्र सोडले. भ्रष्टाचारामुळे गोरगरिबांच्या तळतळाट लागल्याने भूजबळांनी जेलवारी केली आहे, त्यांनी माझ्या शिक्षणावर, अभ्यासावर बोलू नये. मला संविधानाचा अभ्यास आहे. जाती, जातीत गैरसमज करून मराठ्यांचं आरक्षण रोखण्याचं भूजबळांच स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका. असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.
सभेतील ठळक वैशिष्टये … मुद्दे
ओबीसी प्रवर्गात येण्याचे सर्व निकष पूर्ण केल्याने मराठा समाजाला आरक्षण देण्यापासुन कुणीही रोखू शकत नाही.
३५ लाख नोंदी सापडल्या आहेत. ८० टक्के लढाई जिंकली आहे. आरक्षणाची झुंज शेवटच्या टप्प्यात आली आहे. राजकिय षढयंत्रात अडकायचं नाही. संधीचं सोनं करण्यासाठी सतर्क रहा …जातीपेक्षा नेत्यांना, पक्षाला स्थान देऊ नका.
मुस्लीम, बौद्ध समाज बांधवांकडुन चहा, पाण्याची सोय
सभेसाठी आलेल्या लोकांसाठी मराठा व्यापारी बांधवांनी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. मुस्लीम समाज बांधवांनी एक लाख पाच हजार पाण्याच्या पाईचची सोय केली होती तर समस्त बौद्ध समाज बांधवांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर चहाची व्यवस्था केली होती. जिव्हाळा ग्रुपच्या वतीने शंभर कॅरेट केळीची व जारच्या पाण्याची व्यवस्था केली होती.
थंडीतही महिलांची लक्षणीय उपस्थिती
सभास्थळी महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. गेल्या चार दिवसापासुन थंड गारठा सुरू आहे, तो रविवारी सांयकाळी होता, अशा स्थितीत महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. शिवाय बच्चे कंपनीही मोठ्या उत्साहाने सभेसाठी दाखल झाली होती.
कर्नाटकातील मराठा बांधवाची लक्षवेधी उपस्थिती
उमरगा तालुका कर्नाटक राज्याच्या सिमेलगत असल्याने बिदर व कलबुर्गी जिह्यातील एकंबा, उजळंब, गदलेगाव, कांबळेवाडी, जामगा, आळंगा, मन्नाळी, व्हन्नाळी, शिरगुर, लाडवंती, घोटाळ, जाजनगुगळी, प्रतापूर, कोपनहिप्परगा, खजुरी, होदलुर, आणूर आदी सिमेलगतच्या गावातील मराठा बांधव सभेला उपस्थित होते.
किसन माने यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तालुक्यातील माडज येथील तीस वर्षीय तरुण किसन माने यांनी आत्महत्या केली होती. मनोज जरांगे पाटील यांनी (कै.) माने यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.