मणिपूर पुन्हा पेटले, इंटरनेट सुरू होताच हिंसाचार भडकला
मणिपूर पुन्हा एकदा पेटले आहे. मणिपुरात सोमवारी दुपारी मोठा हिंसाचार उफाळून आला. या हिंसाचारात किमान 13 ठार झाले आहेत. टेंगनौपाल जिह्यातील सायबोलजवळ लेटिथु गावात दोन गटांत ही धुमश्चक्री झाली.
दोन्ही बाजूने अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. मणिपूर सरकारने काल रविवारी इंटरनेटवरील बंदी हटवल्यानंतर आज हा हिंसाचार उफाळून आला आहे.
हिंसाचार झाला त्या ठिकाणापासून सुरक्षा दलाचे पथक जवळच होते. हिंसाचाराची माहिती मिळताच सुरक्षा दलाने घटनास्थळी धाव घेतली, 13 मृतदेह रस्त्यांवर पडलेले आढळून आल्याचे सुरक्षा दलाने सांगितले. मृतदेहांजवळ कोणतेही शस्त्र्ा सापडले नाही.
शांतता करारानंतर हिंसाचार
दहशतवाद्यांच्या दोन गटांत ही धुमश्चक्री झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्य म्हणजे मणिपूरमधील युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट या दहशतवादी संघटनेने सरकारसोबत 29 नोव्हेंबर रोजी शांतता करारावर स्वाक्षरी केली. त्यानंतर उफाळलेल्या या हिंसाचाराने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
मणिपुरात 3 मेपासून मैतेई आणि कुकी या दोन समाजांत जातीय संघर्ष सुरू आहे. या हिंसाचारात आतापर्यंत कमीत कमी 182 लोकांचा मृत्यू झाला असून जवळपास 50 हजारांहून जास्त लोक बेघर झाले आहेत. हिंसाचारामुळे मणिपुरात इंटरनेट सेवा 3 मेपासून बंद करण्यात आली. 23 सप्टेंबरला काही वेळेसाठी इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली होती, परंतु 26 सप्टेंबरला पुन्हा इंटरनेटवर बंदी घालण्यात आली.