”आतातरी सुधरा नाहीतर जनता तुम्हाला संपवून टाकेल” विजयी सभेत नरेंद्र मोदी कडाडले
चार राज्यांच्या हाती आलेल्या निकालांपैकी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपने बाजी मारली आहे. तर तेलंगणा राज्य बीआरएसच्या हातातून निसटून काँग्रेसच्या हातात गेलं आहे.
तीन राज्यात अभूतपूर्व यशानंतर दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत विजयी सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं.
Assembly Election Results 2023
या सभेमध्ये बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, राजकारणाच्या एवढ्या वर्षांमध्ये मी कधी भविष्यवाणी केली नव्हती. परंतु यावेळी तो नियम मी मोडला होता. राजस्थानमध्ये काँग्रेस येणार नाही, असं मी म्हटलं होतं. तसंच झालं. राजस्थानमध्ये भाजपचा विजय झाला. मध्य प्रदेशमध्येही पुन्हा आपलंच सरकार आलेलं आहे. इतक्या वर्षांनंतरही भाजपवरचा भरोसा वाढतच आहे.
”छत्तीसगडमध्ये मी पहिल्याच सभेमध्ये सांगितलं होतं की, मी काही मागायला आलेलो नाही. ३ डिसेंबरनंतर सरकार स्थापनेचं निमंत्रण देण्यासाठी आलोय. तेच झालं. मी तेलंगणाच्या जनतेचेही आभार मानतो. प्रत्येक निवडणुकीत लोकांचा भाजपवरचा विश्वास वाढत चालला आहे. तेलंगणामध्ये भाजप लोकांसाठी काम करेल, यात संशय नाही. भाजपने सेवा आणि सुशासनाच्या राजकारणाचं नवं मॉडेल प्रस्थापित केलं आहे.”
मोदी पुढे म्हणाले की, भाजप सरकार केवळ योजना बनवत नाही. तर प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असतं. स्वार्थ काय आहे आणि राष्ट्रहीत काय आहे, हे मतदार ओळखून आहेत.
जिंकण्यासाठी हवेतल्या गोष्टी करणं आणि खोटी आश्वासनं देणं, हे मतदारांना आवडत नाही. मतदारांना स्पष्ट रोडमॅप आणि विश्वास पाहिजे असतो. भारताचा मतदार हे ओळखतो, की काय खरं अन् काय खोटं.
”आजच्या या हॅटट्रिकने २०२४च्या हॅटट्रिकची गॅरंटी दिलीय. केंद्र सराकरने भ्रष्टाचाराच्या विरोधात जे आंदोलन उभं केलं आहे, त्याला समर्थन मिळतंय. जे पक्ष आणि नेते भ्रष्टाचाऱ्यासोबत उभे आहेत, त्यांना देशातल्या जनतेले स्पष्ट संदेश दिला आहे. भ्रष्टाचाऱ्यांना कवच देणाऱ्यांना जनतेने धडा शिकवलाल आहे.
काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीला हा धडा आहे. काही घराणेशाही जोपासणाऱ्या कुटुंबांना सोबत घेऊन एकत्र आल्याने फोटो चांगला येईल परंतु देशाचा विश्वास जिंकला जात नाही. जनतेचं मन जिंकण्यासाठी राष्ट्रसेवेचा वसा पाहिजे. परंतु त्यांच्यात तो दिसत नाही.”
”आजचे हे निकाल त्यांना इशारा आहेत जे विकासाच्या विरोधात उभे राहतात. कोणत्याही विकासाच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून विरोध होतो किंवा चेष्टा केली जाते. अशा सगळ्या पक्षांना आज गरीबांनी इशारा दिलाय की, सुधरा.. नाहीतर जनता तुम्हाला साफ करुन टाकेल.” असा दम मोदींनी विरोधकांना दिला.