मुख्यमंत्र्यांवरची आक्षेपार्ह टीका ठाकरेंना भोवणार का ?
उद्धव ठाकरेंनी अवकाळीच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. उद्धव ठाकरेंच्या ठाकरी शैलीतील टीकेवरून शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे.
‘त्या’ वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंवर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना करत आहे.
देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडाला असताना महाराष्ट्रातील राजकारणात नवं वादळ घोंगावू लागलं आहे. अवकाळी पावासाच्या मुद्यावरून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तिखट शब्दात टीका केली आहे. ‘गद्दारांचे पुनर्वसन कसं करायचं यावरच त्यांचे लक्ष आहे – जो व्यक्ती आपल्या राज्यात शेतकऱ्यांची मदत करत नाही तो व्यक्ती दुसऱ्या राज्यात दुसऱ्या पार्टीच्या प्रचाराला जातोय असा व्यक्ती राज्य चालवण्यासाठी नालायक आहे,’ अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.
उद्धव ठाकरेंनी केलेल्या या टीकेमुळे ठाकरे- शिंदे राजकीय संघर्षाला नवं वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंविषयी वापरलेल्या एका शब्दावर सत्ताधारी शिवसेनेनं आक्षेप घेतलाय. त्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंवर कायदेशीर कारवाई करण्याविषयी सत्ताधारी शिवसेना विचार करत आहे. मंत्री शंभुराज देसाई यांनी याबाबतचे संकेत दिले.
मुख्यमंत्र्यांचा पलटवार
राज्यात झालेल्या अवकाळी पावसाची वेळीच दखल घेऊन अवकाळी पाऊस पडलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. सरकारचे मंत्री आणि खासदार यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ज्यांनी कायम घरात बसून फेसबुक लाईव्ह करून सरकार चालवले त्यांनी आम्हाला शिकवू नये, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. राज्य सरकार अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना नक्की दिलासा देईल आणि कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी तेलंगणा येथील प्रचार सभेनंतर बोलताना स्पष्ट केले.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यावरून मविआ सरकारनं नारायण राणे यांना अटक केली. त्यावरून राज्यात मोठा राजकीय गदारोळ झाला होता. आता उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंविषयी केलेल्या वक्तव्यामुळे ठाकरेंची कोंडी करण्याची संधी भाजप-आणि शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला मिळाली आहे. त्यामुळे आगामी काळा उद्धव ठाकरेंनी शिंदेंविषयी केलेल्या वक्तव्यावरून राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.