शिंदे सरकारचा मोठा निर्णय ! सरकारी कर्मचारी होणार ‘मालामाल’; महागाई भत्त्यात झाली चार टक्के वाढ
मुंबई : राज्यात कार्यरत असलेल्या १७ लाख राज्य कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शनधारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे सरकारने राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. १ जुलैपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्यात आली आहे.
राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार १ जुलै २०२३ पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४२ वरून ४६ टक्के करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ १ जुलै २०२३ ते ३१ ऑक्टोबर २०२३ या कालावधीतील थकबाकीसह नोव्हेंबरच्या वेतनासह रोखीने देण्यात यावी, असा निर्णय सरकारने घेतला आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या वेतनासोबत मिळणार
महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्याबाबत विद्यमान तरतुदी आणि कार्यपद्धती त्याचप्रकारे लागू राहिल, यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा.