विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला मिळाले 33 कोटी;नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत भारतीय संघाचे मनोबल वाढवले
अहमदाबाद : येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना रंगला. भारताला हरवून ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला आहे. आठ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन संघ चॅम्पियन बनला आहे.
ऑस्ट्रेलियाने यापूर्वी 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 मध्ये विजेतेपद पटकावले होते. हा सामना जिंकल्याने ऑस्ट्रेलियन संघावर पैशांचा पाऊस पडला आहे. कांगारू संघाला 33.31 कोटी रुपये मिळाले आहेत. तर भारताला 16.65 कोटींवर समाधान मानावे लागले.(33 crores for world champion Australia Indian team only on this amount…)
आयसीसीने स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच बक्षिसांची रक्कम जाहीर केली होती. 83.29 कोटी रुपये या स्पर्धेसाठी बक्षीस रकमेचे बजेट होते. यातील विजेत्या संघाला 33.31 कोटी रुपये (चार दशलक्ष अमेरिकन डॉलर) मिळतील. त्याचवेळी, अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला 16.65 कोटी रुपये (दोन दशलक्ष अमेरिकन डॉलर) मिळणार असल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले होते.
या संघांवरही बक्षिसांची लयलूट
उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना 6.66 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला. त्याचबरोबर गट फेरीतून बाहेर पडलेले सहा संघ पाकिस्तान, अफगाणिस्तान, इंग्लंड, श्रीलंका, बांगलादेश आणि नेदरलँड्स यांनाही पैसे मिळाले आहेत. या सहा संघांना 83.29 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे.
मोदींनी दिला टीम इंडिया धीर
टीम इंडियाच्या पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत भारतीय संघाचे मनोबल वाढवले. त्यांनी ट्वीटमध्ये लिहले की, प्रिय टीम इंडिया, विश्वचषकादरम्यान तुमची प्रतिभा आणि दृढनिश्चय उल्लेखनीय होता. तुम्ही मोठ्या भावनेने खेळलात आणि देशाला मोठा अभिमान मिळवून दिला. आम्ही आज आणि सदैव तुमच्या पाठीशी उभे आहोत.