ताज्या बातम्या

‘लेक लाडकी’ आता नव्या स्वरूपात; शासन देणार 1 लाख 1 हजार रुपये, मुलींच्या शिक्षणासाठी होणार मदत


मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना भरीव मदत व्हावी, याकरिता शासनाने (Maharashtra Government) माझी कन्या भाग्यश्री (Majhi Kanya Bhagyashree Yojana) या योजनेत सुधारणा करून नवीन लेक लाडकी योजना (Lek Ladki Yojana) सुरू केली आहे.योजनेनुसार पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबात १ एप्रिल २०२३ वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना प्रत्येकी एक लाख एक हजार रुपये दिले जाणार आहेत. कुटुंबाला एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे.

मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी माझी कन्या भाग्यश्री ही योजना एक ऑगस्ट २०१७ मध्ये सुरू केली होती. त्यामध्ये एका मुलींवर कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया केल्यास ५० हजार रुपये त्या मुलीच्या नावावर केलेल्या २५ हजार रुपयांच्या ठेव पावत्या दिल्या जात होत्या, तसेच दांपत्यास एक मुलगा व मुलगी झाल्यास हा लाभ दिला जात नव्हता. शासनाने मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी प्रोत्साहन व होणाऱ्या मुलींना शिक्षणास मदत व्हावी, या हेतूने ही नवीन योजना सुरू केली आहे.

अशी आहे योजना

पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील. त्याप्रमाणे माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) ही योजना करून राज्यात १ एप्रिल २०२३ पासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’ सुरू करण्यास शासनाने नुकतीच मान्यता दिली.

योजनेचे असे आहेत लाभ

पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये. मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये. मुलगी सहावीत गेल्यावर सात हजार रुपये. अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये, तर लाभार्थी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये दिले जाणार. मुलीस एकूण एक लाख एक हजार रुपये दिले जाणार आहेत.

आवश्यक कागदपत्रे

लाभार्थीचा जन्माचा दाखला. कुटुंबप्रमुखाचा एक लाख रुपये किंवा कमी उत्पन्न असल्याचा तहसीलदार यांचा दाखला.

लाभार्थी, पालकांचे आधारकार्ड. बँकेच्या पासबुकाची पहिल्या पानाची छायांकित प्रत. पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड छायांकित प्रत.

मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरिता १८ वर्षे पूर्ण झाल्यावर लाभार्थींचे मतदार यादीत नाव आवश्यक)

संबंधित टप्प्यावर मुलगी शिक्षण घेत असल्याचा संबंधित शाळेचा दाखला.

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र

योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये एक एप्रिल २०२३ रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील. पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button