पतीच्या दिसण्याने आणि त्याच्या गडद रंगामुळे नाराज,’काळ्या आणि कुरूप’ पतीला जिवंत पेटवून केले ठार अन….
बरेली (Bareilly) येथे चार वर्षांपूर्वी आपल्या ‘काळ्या आणि कुरूप’ पतीला जिवंत पेटवून देणाऱ्या 26 वर्षीय महिलेला येथील स्थानिक न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
प्रेमश्री असे या महिलेचे नाव असून सध्या ती 26 वर्षांची आहे. प्रेमाश्रीने कुर्ह फतेहगढमधील बिचेटा येथील रहिवासी असलेल्या 25 वर्षीय सत्यवीर सिंगसोबत लग्न केले होते. मात्र ती तिच्या पतीच्या दिसण्याने आणि त्याच्या गडद रंगामुळे नाराज होती. या कारणास्तव ती वारंवार घटस्फोटाची मागणी करत होती.
पती पत्नीमध्ये वारंवार खटके उडत होते मात्र, सत्यवीर आपल्या लग्नाच्या वचनबद्धतेवर ठाम राहिला. त्याला हा संसार करायचा होता. पुढे या जोडप्याला नोव्हेंबर 2018 मध्ये एक मुलगी झाली. मात्र प्रेमश्रीला काहीही करून पतीपासून सुटका हवी होती. तिने 15 एप्रिल 2019 रोजी सत्यवीर झोपेत असताना त्याच्यावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिले. सत्यवीरला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
सत्यवीरचा भाऊ हरवीर सिंग याने आयपीसी कलम 302 (हत्या) अंतर्गत एफआयआर दाखल केला, ज्यामुळे प्रेमश्रीला अटक करण्यात आली. आता मंगळवारी न्यायालयाने दिलेल्या निकालामध्ये सत्यवीरच्या मृत्यूच्या कारणाची पुष्टी झाली, ज्यामध्ये त्याची पत्नी म्हणजेच प्रेमश्रीवर हत्येचा आरोप होता.
आपल्या पत्नीवर आरोप करत सत्यवीरने घटनेबाबत माहिती दिली होती की, ‘या घटनेच्या एक दिवस आधी मी माझ्या पत्नीला तिच्या पालकांच्या घरी घेऊन गेलो होतो. मी त्याच रात्री घरी परतलो. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी मी घरी झोपलो होतो तेव्हा माझ्या पत्नीने मला पेटवून दिले.’ याबाबत आपल्या बचावात, प्रेमश्रीने दावा केला की, तिने आपल्या पतीला वाचवण्याचा प्रयत्न केला होता आणि या दरम्यान तिला भाजले होते.