नेत्यांचे घर, कार्यालये पेटविण्याचा कट नियोजित? संशयितांची धरपकड
बीड : शहरातील आमदार, माजी मंत्र्यांचे घर पेटविण्यात आले तर काहींचा प्रयत्न झाला तसेच राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांची कार्यालयेही पेटविण्यात आली; परंतु हा सर्व कट नियोजित असल्याचा संशय आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये पाटोदा तालुक्यातील अंमळनेर, बीड तालुक्यातील नाळवंडी व इतर गावांतील तरूणांचा समावेश असल्याचे समोर आले आहे तसेच जाळपोळ करणारे लोक हे हातात पेट्रोल, डिझेलच्या बाटल्या घेऊन गर्दीत प्रवेश करत असल्याचेही व्हिडीओ फुटेज पोलिसांनी मिळविले आहेत. त्याच अनुषंगाने आता तपास सुरू आहे.
माजलगावचे राष्ट्रवादीचे आ.प्रकाश सोळंके यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत काही लोकांनी त्यांच्या घरावर दगडफेक करत वाहने जाळली नंतर घरही पेटविले. हे लोण नंतर बीड शहरात आले. दुपारपर्यंत शांत असलेले बीड चार वाजल्यानंतर पेटण्यास सुरूवात झाली. सर्वांत आगोदर बीड शहरातील रस्त्यांवर टायर जाळण्यात आले. त्यानंतर जमावातील एक गट बार्शी रोडवरील शरद पवार गटाच्या ताब्यात असलेल्या राष्ट्रवादी भवनाकडे गेला तेथे दगडफेक करून भवन जाळण्यात आले. तेथून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यालय पेटविण्यात आले. बाहेर उभा असलेली त्यांची महागडी गाडीही पेटवली. त्यानंतर हाच जमाव क्षीरसागरांच्या घराकडे गेला. तेथे आ. संदीप क्षीरसागर, जयदत्त क्षीरसागर, डॉ. भारतभूषण क्षीरसागर हे सर्व एकाच छताखाली राहतात. सायंकाळच्या सुमारास या बंगल्यालाही आग लावून बाहेरची जवळपास आठ वाहने जाळण्यात आली. तेथून हा जमाव नगर नाक्यावरील शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या कार्यालयाकडे गेला. कार्यालयाची तोडफोड करून कार्यालय पेटविण्यात आले नंतर भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, बीआरएसचे समन्वयक दिलीप गोरे यांचे कार्यालय पेटवून नुकसान केले.
एवढ्यावरही हा जमाव शांत राहिला नाही. रात्री सात वाजण्याच्या सुमारास हा जमाव माजी मंत्री शिवाजीराव पंडित, माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या घरांकडे गेला. तेथे त्यांनी दगडफेक करत बाहेर जाळपोळ केली. काही लोकांनी त्यांच्या घरात पेट्रोल बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला; परंतु वेळीच पोलिस आल्याने तो अयशस्वी झाला. पोलिसांनी अश्रुधूरांचा वापर केल्याने जमाव पांगला. त्यानंतर जाळपोळीला ‘ब्रेक’ लागला.
दरम्यान, या सर्व प्रकरणांमध्ये बीड शहर व शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गंभीर कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात आतापर्यंत जिल्हाभरातून ९५ लोकांना ताब्यातही घेतले आहे. बीड शहरात दगडफेक करणाऱ्या आरोपींमध्ये बीड शहर कमी आणि ग्रामीण भागातील आरोपींचाच जास्त समावेश आहे. काही लोक हे पाटोदा तालुक्यातील अंमळनेर, बीड तालुक्यातील नाळवंडी व इतर गावांतील असल्याचे समोर आले आहे. त्यांची विचारपूस करून इतर लोकांची नावे शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू होता.
अपर महासंचालक बीडमध्ये तळ ठोकून
बीड जिल्ह्यात नेत्यांची घरे पेटविल्यानंतर अपर पोलिस महासंचालक सक्सेना, महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, मल्लिकार्जुन प्रसन्ना यांच्यासह तीन आयपीएस अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून आहेत, तसेच प्रत्येक घटनेचा आढावा घेत असून, पकडलेल्या संशयितांची कसून चौकशी करत आहेत. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे शहरात व जिल्ह्यात फिरून आढावा घेत आहेत.
९५ लोकांना घेतले ताब्यात
सोमवारी जाळपोळीनंतर संचारबंदी लागू केली. रात्री उशिरा विविध ठाण्यात गुन्हे दाखल केले. मंगळवारी सकाळपासूनच संशयितांना पकडण्याची कारवाई सुरू झाली. बुधवारी दुपारपर्यंत ९५ लोकांना ताब्यात घेतले होते, तसेच रात्री उशिरापर्यंत व्हिडीओ फुटेज व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आधार घेत त्यांची ओळख पटवून ताब्यात घेतले जात होते. ही धरपकड रात्री ९ वाजेपर्यंत सुरूच होती.
रॅपीड ॲक्शनफोर्स बोलावली
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे पाहून रॅपीड ॲक्शन फोर्स, राज्य राखीव दल आदी विशेष तुकड्या बीडमध्ये बोलावल्या आहेत. सध्या जिल्ह्यात भरपूर फोर्स झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. याच सर्व तुकड्यांना सोबत घेऊन पथसंचलन केले जात आहे.
कोडवर्ड असल्याची चर्चा
जाळपोळ करणारे कोडवर्डमध्ये बोलत होते, अशी माहितीही समोर आली आहे. क्षीरसागरांचा बंगला पेटविल्यानंतर मस्के, खांडे यांची कार्यालये पेटविली. तेथून २२ नंबरला चला रे.. असे म्हणत जमाव माजी आ. अमरसिंह पंडित यांच्या घराकडे आला. हे सर्व लोक प्री प्लॅन करून आणि यादी घेऊनच जाळपोळ करत असल्याचा संशय आहे. हे सर्व कोडवर्डमध्ये बोलत होते, असेही सूत्रांनी सांगितले. पोलिस याचाही तपास करत आहेत.
फोटो, व्हिडीओ घेणाऱ्यांना दमदाटी
राष्ट्रवादी भवन व खांडे, मस्के यांचे कार्यालय जाळत असताना काही लोक फोटो घेत होते, तसेच काही जणांनी याचा व्हिडीओ तयार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी जाळपोळ करणाऱ्यांनी फोटो काढणाऱ्यांना दमदाटी करत त्यांच्याकडे काठ्या घेऊन धाव घेतली, तसेच व्हिडीओलाही विरोध केल्याचे अनेकांनी सांगितले. अनेक पत्रकारांनाही हा अनुभव आल्याचे सांगण्यात आले.
आतापर्यंत ९५ लोकांना ताब्यात घेतले
जाळपोळ, दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत ९५ लोकांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून इतर लोकांनी नावे घेतली जात आहेत. जाळपोळ करणारे लोक हे कुठले होते? ते बीडमध्ये का आले? त्यांनी पेट्रोलच्या बाटल्या व इतर साहित्य कोठून आणले? याचा तपास केला जात आहे. सध्या तरी प्री प्लॅन आहे की नाही, यावर अधिकृत भाष्य करणे उचित नाही; परंतु याचा तपास सुरू आहे.
– नंदकुमार ठाकूर, पोलिस अधीक्षक, बीड