इन्स्पेक्टरने महिलेला सांगितले , तुम्ही माझ्यासोबत रात्री राहा किंवा तुमच्या मैत्रिणीला घेऊन या ! काय आहे प्रकरण..
बिजनौर : अलीकडच्या काळात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. गुन्ह्याचा तपास करताना गुन्हेगाराला शिक्षा देणं आणि पीडित व्यक्तीला न्याय मिळवून देण्यात पोलिसांची भूमिका महत्त्वाची असते.
पण काही वेळा पोलिसांकडून पीडित व्यक्तीला त्रास होतो. सोशल मीडियावर अशा प्रकारच्या ऑडिओ क्लिप या पूर्वी व्हायरल झाल्या आहेत. उत्तर प्रदेशात असंच एक प्रकरण उघडकीस आलं आहे. पोलीस आणि पीडित महिलेच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे.
उत्तर प्रदेशातल्या बिजनौरमध्ये एका महिलेने तिच्या पतीविरुद्ध हुंडा, तिहेरी तलाक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या इन्स्पेक्टरने या महिलेला सांगितले की, जर तुम्हाला 376सह आणखी गंभीर कलमे कायम ठेवायची असतील तर एकतर तुम्ही माझ्यासोबत रात्री राहा किंवा तुमच्या मैत्रिणीला घेऊन या. या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली. त्यामुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली. एसपींनी ही ऑडिओ क्लिप ताब्यात घेऊन या इन्स्पेक्टरला निलंबित केलं आहे. या प्रकरणाचा तपास आता इंटिलिजन्स सेलकडे सोपवण्यात आला आहे , ‘आज तक’ने या विषयीचे वृत्त दिले आहे.
या प्रकरणाचा तपास इन्स्पेक्टर धर्मेंद्र कुमार गौतम करत होता. या प्रकरणाशी संबंधित एक ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल ऑडिओतला आवाज धर्मेंद्रचा आहे, असा दावा केला जात आहे. यात धर्मेंद्र पीडित महिलेला रात्री सोबत राहण्यासाठी मैत्रिणीला घेऊन येण्याबाबत किंवा मैत्रिण नसेल तर स्वतः येण्याबाबत सांगून तिच्यावर दबाव आणत असल्याचं दिसत आहे.
या ऑडिओत महिलेला सांगितलं जात आहे की, ‘तुझं प्रकरण माझ्या हातात आहे. जर तू मला खूश केलं नाहीस आणि माझं म्हणणं ऐकलं नाहीस तर तुझ्या प्रकरणातली 376 सह अन्य गंभीर कलमं हटवण्यात येतील. मी तुला सहकार्य करत आहे तर तू पण मला साथ दिली पाहिजे.’ पीडित महिलेनं या बाबत पोलीस अधीक्षक नीरज जादौन यांच्याकडे तक्रार केली आणि व्हायरल ऑडिओ क्लिप त्यांच्याकडे सोपवली. त्यानंतर अधीक्षकांनी इन्स्पेक्टर धर्मेंद्र कुमार गौतमला निलंबित केलं. तसंच या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, बिजनौरमधील झाल परिसरातल्या एक महिलेने 12 सप्टेंबर 2023 रोजी तिच्या पती आणि सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला होता. दिल्ली येथील युवकाने 31 मार्च 2022 आणि 5 जुलै 2023 रोजी मला मसूरी येथे नेले. तेथील हॉटेलमध्ये माझ्याशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. मी विरोध केला असता त्याने माफी मागत विवाहाचं वचन दिलं,असा आरोप महिलेने केला आहे. यानंतर सप्टेंबर 2023 मध्ये तिच्याशी विवाह केला. ती या युवकासोबत सासरी राहू लागली. पण काही दिवसांनी तिच्या पतीचा दुसरीकडे विवाह निश्चित झाला असल्याचे तिला समजले. यादरम्यान तिचा पती तिला सोडून सौदी अरेबियाला निघून गेला. तिथून त्याने तिला तिहेरी तलाक दिला. यादरम्यान तिच्या सासरकडच्या लोकांनी हुंड्याची मागणी करत तिला घरातून बाहेर काढले. ही महिला माहेरी आली आणि तिने पती तसेच सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या इन्स्पेक्टरनेदेखील या महिलेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण ऑडिओ व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.