आई-वडिलांच्या इच्छेनुसार श्री विठ्ठल -रूक्मिणी चरणी दोन किलो सोन्याचे मुकुट
पंढरपूर : पंढरपूर येथील सावळ्या विठुरायाच्या चरणी अधूनमधून सोन्या-चांदीच्या वस्तू आणि दागिने भाविक अर्पण करत असतात. उमरी (जि.नांदेड) येथील प्रसिध्द व्यापारी विजय पंढरीनाथ उत्तरवार यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीसाठी सुमारे दोन किलो सोन्याचे (किंमत सुमारे एक कोटी तीन लाख) अत्यंत आकर्षक मुकुट बनवून घेतले आहेत. आई-वडिलांच्या इच्छेनुसार बनवलेले हे मुकुट आषाढी एकादशी दिवशी श्री व सौ. उत्तरवार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे सुपूर्त करणार आहेत.
पंढरपुरातील प्रसिद्ध व्यापारी विठ्ठल कटकमवार यांचे मामा विजय उत्तरवार हे उमरी (जि. नांदेड) येथील सोन्याचे प्रसिध्द व्यापारी आहेत. त्यांच्या आई-वडिलांची श्री विठ्ठल रुक्मिणीसाठी सोन्याचे मुकुट अर्पण करण्याची इच्छा होती. त्यानुसार विजय उत्तरवार आणि त्यांच्या मुलांनी इच्छा पूर्ण करण्याचे ठरवले होते.
खामगाव येथून खास कारागीर बोलवून त्यांनी विठुरायासाठी आणि श्री रुक्मिणीमातेसाठी अत्यंत आकर्षक असे दोन मुकुट बनवून घेतले आहेत. विठुरायासाठीच्या मुकुटासाठी सुमारे ११८४ ग्रॅम तर श्री रुक्मिणीमातेच्या मुकुटासाठी सुमारे ७८४ ग्रॅम, असे दोन्ही मिळून १९६८ ग्रॅम सोन्याचा वापर केला आहे. हे मुकुट आषाढी एकादशी दिवशी सौ. उत्तरवार दांम्पत्य श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे सुपुर्त करणार आहेत.