मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. आज पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात विजांसह पावसाचा इशारा आहे. उर्वरित राज्यातही विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा जैसलमेर, उदयपूर, रतलाम, सिधी, रांची, दिघा ते बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत कायम आहे. कच्छ आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, या प्रणालीपासून पंजाबपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावाने विदर्भात ढगांची दाटी झाली आहे.
विदर्भासह राज्यात उन्हाचा चटका वाढला असून, ढगाळ हवामानामुळे उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. तुरळक ठिकाणी एखाद दुसरी सर सुखावून जात आहे. पावसाला पोषक हवामान झाल्याने आज (ता. २१) विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगाव, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, तसेच विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
वायव्य बंगालच्या उपसागरात पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनाऱ्यालगत कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे. त्याला लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ही प्रणाली उद्यापर्यंत (ता. २२) झारखंडकडे सरकण्याचे संकेत आहेत.
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.
विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
नाशिक, नगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर.