‘शेतकऱ्यांचं संकट दूर होऊ दे’; मुख्यमंत्र्यांनी दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा
मुंबई, 19 सप्टेंबर : आज गणरायाचं आगमण झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आजचा दिवस आनंद उसंडून वाहणार आहे, अगदी शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत विघ्नहर्ता गणेशाचं स्वागत मोठ्या जल्लोषात होत आहे.
आजचा दिवस महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या जीवनातला आनंदाचा दिवस आहे. गणेशाला मी साकडे घातले या महाराष्ट्रातील शेतकऱ्यावरचं अनिष्ट संकट दूर होऊ दे, चांगला पाऊस होऊ दे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.पुढे बोलताना ते म्हणाले की, मी पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना गणेश चतुर्थीच्या मन:पूर्वक शुभेच्छा देतो. गेल्या वर्षी काही गणपती मंडळावर बंधनं होती ते आम्ही सर्व दूर केलेली आहेत. निर्बंधमुक्त वातावरणामध्ये सर्व गणेश भक्तांनी आनंदात गणेशोत्सव साजरा करावा.
जे गणपती मंडळ मागील काही काळापासून गणपती बसवत आहेत, त्या गणपती मंडळाला या वर्षी सुद्धा पुढील पाच वर्षांसाठी गणपती बसवण्याची परवानगी देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. यासाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही.लोकमान्य टिळक यांची जी भूमिका होती सर्व गणेश भक्तांना एकत्रित आणण्याची ती भूमिका घेऊन आम्ही पुढे चालत आहोत. राज्यावरची सर्व विघ्न दूर व्हावी हीच आमची इच्छा आहे .नवीन संसद भवनामध्ये आज सर्व खासदार यांनी प्रवेश केलेला आहे. ही चांगली सुरुवात आहे. पंतप्रधान मोदी यांनी चांगला मुहूर्त शोधला आहे, बाप्पा त्यांना खूप-खूप आर्शीर्वाद देणार आहे, असही यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.