राज्यकर्ते स्वत:वर फुल-पाकळ्यांचे सडे पाडण्यात धन्यता मानत आहेत पण.; ठाकरे गटाचा मोदी सरकारवर निशाणा
मुंबई – देशाच्या अखंडतेविषयी, एकात्मतेबाबत मोदी सरकारने दिलेली सर्व वचने फोल ठरली आहेत. जम्मू-काश्मीर हा तर संवेदनशील विषय आहे. तिकडे आजही जवानांच्या रक्ताचे सडे पडत आहेत. इकडे राज्यकर्ते स्वत:वर फुल-पाकळ्यांचे सडे पाडण्यात धन्यता मानत आहेत, अशा शब्दांत शिवसेनेच्या ठाकरे गटाने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
जवानांना वीरमरण –
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी नुकत्याच झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांचे तीन अधिकारी आणि एक जवान मिळून चौघांना वीरमरण आले. त्या दिवशी भाजपने जी-20 परिषदेच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केला. त्याशिवाय, दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात मोदींवर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्या दोन्ही घडामोडींचा संदर्भ देऊन ठाकरे गटाने आपले मुखपत्र असणाऱ्या दैनिकातील अग्रलेखातून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
प्रत्यक्षात काहीच घडलेले नाही-
राज्यघटनेचे कलम 370 हटवल्याने जम्मू-काश्मीरात सर्व आबादी आबाद होईल असे चित्र सरकारने निर्माण केले. पण, ते खोटेच ठरले. तिथे अजूनही विधानसभा निवडणूक होऊ शकलेली नाही. नायब राज्यपालाच्या भरवशावर संवेदनशील राज्य चालवता येणार नाही.
काश्मीर खोऱ्यात नवे उद्योगधंदे येतील, रोजगार संधी वाढतील, काश्मिरी पंडितांची घरवापसी होईल, असे सांगण्यात आले. त्यातले काहीच प्रत्यक्षात घडलेले नाही. काश्मिरी पंडित आजही बेवारस अवस्थेत निर्वासित छावण्यांत जगत आहेत. त्यामुळे कलम 370 हटवून आणि लडाखची भूमी वेगळी करून सरकारने साध्य काय केले, असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.