‘रस्ते बनवण्यासाठी कचऱ्याचा वापर होणार; 2 ऑक्टोबरला धोरण आणणार’, गडकरींची माहिती
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचा वेग सर्वांनाच माहित आहे. भाजप सत्तेत आल्यापासून गडकरींच्या मंत्रालयाने अनेक महामार्गांची निर्मिती केली आहे.
मेट्रो सिटीपासून ते अतिशय मागास भागांमध्येही गडकरींनी रस्ते बांधले आहेत. दरम्यान, देशाला प्रदुषण आणि कचरामुक्त करण्यासाठी गडकरींनी एक मोठी योजना आखली आहे.
ABP न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत गडकरींनी ‘ग्रीन एक्स्प्रेस वे’ प्रकल्पाची माहिती दिली. नितीन गडकरींनी शुक्रवारी (15 सप्टेंबर) सांगितले की, देशात अमेरिकन तंत्रज्ञानावर काम केले जात आहे. याअंतर्गत देशातील महामार्गांच्या निर्मितीत कचऱ्याचा वापर केला जातोय. कचऱ्यापासून रस्ते निर्मितीला ‘ग्रीन एक्स्प्रेस वे’ प्रकल्प म्हटले जात आहे.
‘गांधी जयंतीनिमित्त धोरण आणणार’
ते पुढे म्हणाले की, आत्तापर्यंत आम्ही गाझीपूरच्या कचऱ्याच्या डोंगरातून दिल्लीत अनेक रस्ते बनवले आहेत. या प्रकल्पामुळे देश कचरामुक्त होण्यात महत होईल. अहमदाबादमध्ये रस्ता तयार करतानाही 25 ते 30 टन कचरा वापरल्याची माहिती त्यांनी दिली. हा कचरा अहमदाबादच्या लँडफिल साइटचा होता. 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त याबाबत धोरण आणत आहोत. यामुळे आपल्या स्वच्छ भारत अभियानाला चालना मिळेल, अशी माहिती गडकरींनी यावेळी दिली.
G-20 मधून देशाला कोणते फायदे
G-20 शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाचा सर्वसामान्यांच्या जीवनावर काय परिणाम होईल? यावर केंद्रीय परिवहन मंत्री म्हणाले की, आपला देश पेट्रोल, डिझेल आणि गॅस इतर देशांकडून मोठ्या प्रमाणावर घेतो. पेट्रोल आणि डिझेलच्या वापरामुळेही प्रदूषण होत आहे. G-20 शिखर परिषदेदरम्यान, आम्ही ग्लोबल बायोफ्यूल्स अलायन्सची घोषणा केली आहे. जैवइंधनामध्ये इथेनॉलचाही समावेश आहे, जे आपले शेतकरी तयार करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.
पेट्रोल आणि डिझेल वाहनांवर काय म्हणाले
पेट्रोल-डिझेल वाहनांवर ते म्हणाले की, पेट्रोल-डिझेल वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांवर खूपच कमी जीएसटी आहे. सरकार आले तेव्हा देशात 48 टक्के डिझेल कार विकल्या जात होत्या, आता हा आकडा 18 टक्क्यांवर आला आहे. डिझेल खूप धोकादायक आहे. लोकांना इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक फायदा होईल, म्हणून ते त्याकडे वळत आहेत, असंही ते यावेळी म्हणाले.