बीड जिल्हा राजकीय मैत्री जपणारा – उपमुख्यमंत्री अजित पवार
बीड : बीडमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची जाहीर सभा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या सभेला बीडकरांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. या सभेत उपस्थितांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केलं.
यावेळी अजित पवारांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. अजित पवार यांनी यावेळी बीड जिल्ह्याचा एक जुना राजकीय किस्सा सांगितला. (Latest Marathi News)
बीडमधील जाहीर सभेला संबोधित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘धनंजय मुंडेंनी काही दिवसांपूर्वी मला सांगितलं, दादा मला इथं सभा घ्यायची आहे. आम्ही सगळ्यांनी का निर्णय घेतला हे सर्वांनी सांगितलं आहे. राजकारण कशासाठी करायचे असते हे बीडकरांना माहीत आहे. मित्रांनो राजकारणात कुणी कुणाचा शत्रू नसतो, कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो. येणाऱ्या काळात बीड जिल्ह्यातील लोकांचे भलं करायचे काम आम्ही करणार आहोत’.
‘प्रत्येकाच्या जीवनात चढ-उतार येत असतात. आम्ही महापुरुषांना आदराचे स्थान देणारे माणसं आहोत. आम्ही शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचाराने पुढे चाललो आहे. मला या सभेतून सांगायचं आहे की, आम्ही महाआघाडीच्या सरकारमध्ये असलो तरी हे सरकार तुमचं आहे’, असे अजित पवार म्हणाले.
‘काही कंपन्या म्हणायच्या आम्ही बीड जिल्ह्याचा पीकविमा काढणार नाही. त्यानंतर आम्ही बीड पॅटर्न उभा केला. आम्ही सरकारच्या माध्यमातून 1 रुपयात पीकविमा काढायचं काम केलं. 1 रुपयाच्या पिकविम्यामुळे राज्यसरकारच्या तिजोरीवर साडेचार हजार कोटींची जबाबदारी आली आहे, अशीही त्यांनी माहिती दिली.
‘आज मोदींचा देशामध्ये करिष्मा आहे. त्यांच्या करिष्म्याचा उपयोग या पुरोगामी महाराष्ट्राला झाला पाहिजे. आज अमेरिका, रशिया, चीननंतर जगामध्ये भारताचा नंबर लागतो, असेही अजित पवार यांनी सांगितले.
‘बीड जिल्हा हा राजकीय मैत्री जपणारा आहे. बीडमध्ये राजकीय शत्रुत्व झालं नाही. दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि दिवंगत विलासराव देशमुख हे वेगवेगळ्या पक्षात होते. एक भाजप आणि दुसरे काँग्रेसमध्ये होते. त्यांची मैत्री जगजाहीर आहे. त्यांनी शेवटपर्यंत मैत्री निभावली.
‘तर आणखी एक किस्सा म्हणजे, क्रांतीसिंह नाना पाटील हे ५७ साली साताऱ्यात निवडून आले. तर ६७ साली बीडमधून निवडणूक जिंकले. त्यावेळी बीडकरांनी ते साताऱ्याचे आहेत म्हणून नाकारले नाही. बीड जिल्हा प्रेमाचा जिल्हा आहे, असा बीड जिल्ह्याचा राजकीय किस्सा अजित पवारांनी सांगितला.