विराट कोहलीला डायमंड बॅट गिफ्ट देणार
भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. 15 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत विराटने अनेक मोठमोठे विक्रम मोडले. आता वन-डे वर्ल्डकप स्पर्धेसाठी विराट सज्ज होतोय.सुरतस्थित एका व्यावसायिकाने विराटचे अनोख्या पद्धतीने कौतुक करण्याचा निर्णय घेतला आहे. हा व्यावसायिक विराटला 1.04 कॅरेट हिर्याने जडलेली बॅट भेट देण्याच्या तयारीत आहे. विराटला भेट म्हणून मिळणारी डायमंड बॅट तयार होण्यासाठी एक महिना लागला. सुरतमधील हिरे व्यावसायिक हा क्रिकेटचा मोठा चाहता आहे आणि गेल्या काही वर्षांपासून तो विराटच्या खेळीच्या प्रेमात पडलेला आहे. या बॅटची किंमत सुमारे 10 लाख रुपये आहे.
विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 वर्षे पूर्ण केली. त्याने या कालावधीत भारताकडून 111 कसोटींत 49.29 च्या सरासरीने 8,676 धावा केल्या आहेत. त्यात 29 शतके व तितक्याच अर्धशतकांचा समावेश असून, नाबाद 254 ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. 275 वन-डे सामन्यांत त्याच्या नावावर 46 शतके व 65 अर्धशतके आहेत. यात त्याने 57.32 च्या सरासरीने 12,898 धावा केल्या आहेत. 115 टी-20 सामन्यांत 52.73 च्या सरासरीने त्याच्या नावावर 4,008 धावा असून, त्यात 1 शतक व 37 अर्धशतकांचा समावेश आहे.
डायमंड टेक्नॉलॉजी तज्ज्ञ आणि सुरतमधील लेक्सस सॉफ्टमॅक कंपनीचे संचालक उत्पल मिस्त्री यांनी डायमंड बॅट बनवण्याच्या प्रक्रियेवर देखरेख केली होती. देशातील एका अव्वल क्रिकेटपटूला हिर्याची बॅट भेट द्यायची होती. प्रयोगशाळेतील हिरा आणि नैसर्गिक हिरा यातील फरक सांगणे यंत्राशिवाय खूप अवघड आहे. डोळ्यांनी बघून तुम्ही सांगू शकणार नाही, असे उत्पल मिस्त्री यांनी सांगितले.